शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की हाडांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हाडांची घनता कमी होणे, वारंवार अंगदुखी जाणवणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
विशेषतः वयाच्या तिशीनंतर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. मात्र, कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी प्रत्येक वेळी पूरक गोळ्यांचीच मदत घ्यावी लागते का? आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थही हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मुंबईतील एका अस्थिरोगतज्ज्ञांनी कॅल्शियमने समृद्ध असलेल्या तीन पदार्थांची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, यातील काही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.
कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी कोणते ३ पदार्थ खावेत?
मुंबईतील अस्थिरोगतज्ज्ञ, आरोग्यविषयक मार्गदर्शक आणि NutriByte Wellness चे सहसंस्थापक डॉ. मनन व्होरा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेकडे लक्ष वेधलं. त्यांच्या मते, आहारातून कॅल्शियम मिळवण्यावर भर देणं हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यांनी तीन पदार्थांचा उल्लेख केला आहे.
१. नाचणी
नाचणी हा कॅल्शियमचा एक चांगला वनस्पतीजन्य स्रोत मानला जातो. इतर अनेक तृणधान्यांच्या तुलनेत नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. डॉ. व्होरा यांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे ३४४ मिलिग्रॅम कॅल्शियम असतं, त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला कॅल्शियम मिळवण्यास मदत होऊ शकते.
नाचणीची भाकरी, आंबील, धिरडी किंवा नाचणीची खीर अशा विविध पदार्थांच्या माध्यमातून तिचा आहारात समावेश करता येतो. रोजच्या जेवणात सहज वापरता येणारा हा पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. डॉ. मनन व्होरा सांगतात, ‘पहिला पदार्थ म्हणजे नाचणी. १०० ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे ३४४ मिलिग्रॅम कॅल्शियम असतं. हे प्रमाण बहुतांश तृणधान्यांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे.’
२. पार्मेजान चीज
दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांसाठी पार्मेजान चीज हा कॅल्शियमचा आणखी एक स्रोत ठरू शकतो. या चीजमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. डॉ. व्होरा यांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम पार्मेजान चीजमध्ये सुमारे ११०० ते १२०० मिलिग्रॅम कॅल्शियम असू शकतं. यामध्ये प्रथिनंही असतात.याशिवाय, पार्मेजान चीजमध्ये व्हिटॅमिन K2 असतं. हाडांच्या चयापचयाच्या प्रक्रियेत या जीवनसत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे संतुलित आहारात योग्य प्रमाणात या पदार्थाचा समावेश करणं काही व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकतं.डॉ. व्होरा यांच्या मते, ‘दुसरा पदार्थ म्हणजे पार्मेजान चीज. १०० ग्रॅममध्ये साधारण ११०० ते १२०० मिलिग्रॅम कॅल्शियम मिळतं. त्यात उच्च दर्जाची प्रथिनं आणि कॅल्शियमच्या हाडांच्या आरोग्यातील भूमिकेला पूरक ठरणारं व्हिटॅमिन K2 देखील असतं, त्यामुळे थोड्या प्रमाणात या पदार्थाचा आहारात समावेश करणं हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.’
३. तीळ
आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे तीळदेखील कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. डॉ. व्होरा यांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम तिळामध्ये सुमारे ९७५ मिलिग्रॅम कॅल्शियम असतं. याशिवाय त्यात मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस ही खनिजंही असतात. हाडांची रचना आणि स्नायूंचं कार्य सुरळीत राहण्यासाठी ही खनिजं महत्त्वाची आहेत.
ते सांगतात, ‘तिसरा पदार्थ म्हणजे तीळ. त्यामध्ये कॅल्शियमसोबत मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस असतात. ही खनिजं हाडांची रचना आणि स्नायूंच्या कार्यासाठी मदत करतात. शरीराला पोषक घटक मिळण्यासाठी तीळ भिजवून, भाजून किंवा दळून खाणं अधिक उपयुक्त ठरू शकतं.’
केवळ कॅल्शियम पुरेसं नाही; व्हिटॅमिन D कडेही लक्ष द्या!
आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं असलं तरी शरीराला कॅल्शियमचा योग्य वापर करता यावा यासाठी व्हिटॅमिन D आवश्यक आहे. हे जीवनसत्त्व आतड्यांमधून कॅल्शियम शोषून घेण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं, त्यामुळे व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास कॅल्शियमचा पुरेसा फायदा मिळण्यात अडचण येऊ शकते.डॉ. व्होरा यांनीही या मुद्द्यावर विशेष भर दिला आहे. ते सांगतात, ‘या तिन्ही पदार्थांमधून केवळ कॅल्शियमच नव्हे, तर हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियेसाठी मदत करणारे इतर पोषक घटकही मिळतात. मात्र, व्हिटॅमिन D शिवाय शरीरात कॅल्शियमचं शोषण प्रभावीपणे होऊ शकत नाही, त्यामुळे आहारातील मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्या आणि नियमित सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.’
(महत्त्वाची सूचना : ही माहिती आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आहे. कॅल्शियमची कमतरता असल्याची शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D च्या पूरक गोळ्या स्वतःहून सुरू करू नका. योग्य आहार, आवश्यक तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला यांच्या मदतीने हाडांचं आरोग्य जपता येऊ शकतं.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.