🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली पोलिसांचे मोठे यश! समुपदेशनाने पारधी समाजातील १४ फरार आरोपींचे पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण!

सांगली पोलिसांचे मोठे यश! समुपदेशनाने पारधी समाजातील १४ फरार आरोपींचे पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण!


गुन्हेगारीच्या गर्तेत अडकलेल्यांना गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सांगली जिल्हा पोलिसांनी राबवलेला विशेष उपक्रम यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समुपदेशन करून पारधी समाजातील २ फरारी आणि १२ पाहिजे असलेल्या अशा एकूण १४ आरोपींचे आत्मसमर्पण घडवून आणले आहे. सांगली पोलीस मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात या आरोपींना पोलिसांसमोर हजर करण्यात आले.

​पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत निर्देश दिले होते.


​'आत्मसमर्पण योजने'तून समुपदेशनावर भर

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या संकल्पनेतून "पाहिजे, फरारी आरोपींची आत्मसमर्पण योजना" ही मोहीम हाती घेण्यात आली. एलसीबीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार उदयसिंह माळी, संदीप गुरव, अरुण पाटील, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सुनिता शेजाळे, सूरज थोरात, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते आणि रोहन घस्ते यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

​या पथकाने सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत जाऊन आरोपींच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. गुन्हेगारीचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरोपींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कौन्सिलिंग (समुपदेशन) करून त्यांना विश्वासात घेतले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव व पोहेकॉ उदयसिंह माळी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.


​२० प्रलंबित गुन्ह्यांतील आरोपी वर्ग

पोलीस पथकाच्या या प्रयत्नांमुळे सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत शरीरविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध दाखल असलेल्या प्रलंबित २० गुन्ह्यांतील १४ आरोपींना उपस्थित करण्यात यश आले. यात सांगली शहर पोलीस ठाण्यातील ०७ गुन्हे, आष्टा पोलीस ठाण्यातील ०३ गुन्हे, ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील ०६ गुन्हे आणि कुंडल पोलीस ठाण्यातील ०४ गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व १४ आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले आहे.

​पोलीस मुख्यालयात पार पडला कार्यक्रम

या विशेष उपक्रमाचा कार्यक्रम सांगली पोलीस मुख्यालयात पार पडला. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव, पोउनि महादेव पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

​तसेच या मोहिमेत सामाजिक सहभाग दर्शवत सहकार्य करणारे दलित महासंघाचे पदाधिकारी सुधाकर वायदंडे, शशिकांत नांगरे, सदाभाऊ चांदणे, सागर लोंढे, शिवाजी पांढरे, प्रभाकर तांबीरे, नारायण वायदंडे, दत्तात्रय परिसे, गोरख सावंत आणि 'आदिवासी पारधी हक्क अभियाना'चे टारझन पवार, निर्मला पवार, इंद्रजीत काळे, सुनील काळे, शेट पचार यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.