लखनऊ: बीएच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलानं स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचे लोक धावले. पण घराचं दार आतून बंद होतं. शेजाऱ्यांनी मुलाच्या वडिलांना तातडीनं माहिती दिली.
शेतात गेलेले मुलाचे वडील आणि सावत्र आई घरी पोहोचले, तेव्हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. कुटुंबियांनी त्याला सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यात घडली.
मृत मुलाची ओळख पटली आहे. लव पटेल (१९) असं त्याचं नाव आहे. सिंगार गावचा रहिवासी असलेला लव पटेल बीएचा अभ्यास करत होता. तो वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. लवची आई संगीता पटेल यांचा २००९ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी स्वत:ला पेटवून घेत जीवन प्रवास संपवला. आईच्या मृत्यूनंतर लव वडिलांसोबत राहात होता. लवच्या मृत्यू आधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांना लवच्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ सापडला आहे. जीव देण्यापूर्वी त्यानं व्हिडीओ चित्रित केला होता. त्यात तो वडिलांबद्दल बरंच बोलताना दिसतो. मी तुम्हाला बराच त्रास दिला आहे आणि पुढेही देत राहिलो असतो, असं लव वडिलांना उद्देशून म्हणाला. त्यानंतर त्यानं कॅमेरा आईच्या फोटोकडे फिरवला. आता मी आईकडे जातोय, असं लवनं व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.
या व्हिडीओत लव त्याच्या वडिलांना पैसे तुमच्याकडेच ठेवा, असं म्हणतो. माझ्या मृत्यूला मित्र, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक जबाबदार नसल्याचं लवनं म्हटलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानं लवच्या मृत्यूबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. लवनं जीवन का संपवलं, यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
लव पटेलचे वडील मुन्नालाल पटेल सिंगारचे ग्राम विकास अधिकारी राहिले आहेत. ते १० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. सध्या ते गावात शेती करतात. त्यांची पहिली बायको हेमलताला मूलबाळ नव्हतं. म्हणून त्यांनी संगीता सोबत दुसरं लग्न केलं होतं.
संगीताकडून त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव लव ठेवण्यात आलं. २००९ मध्ये संगीता यांनी आयुष्य संपवलं. त्यानंतर लव त्याच्या वडिलांसोबत राहू लागला. रविवारी सकाळी मुन्नालाल त्यांची पत्नी हेमलता सोबत शेतात गेले होते. तेव्हा लव घरी एकटा होता. सकाळी दहाच्या सुमारास त्यानं स्वत:वर गोळी झाडून घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.