पतीच्या निधनानंतर दोन चिमुकल्यांसह कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेनं होमगार्ड भरतीसाठी मैदानी चाचणी दिली. यात १६०० मीटर धावण्याच्या चाचणीवेळी साडी नेसून आणि अनवाणी पायाने त्या धावल्या.
त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील या महिलेचं नाव कविता कुमारी असं आहे. कडक उन्हात पायात काहीच न घालता फक्त ६ मिनिटात त्यांनी हे अंतर पार केलं. कविता कुमारी यांच्या जिद्दीचं कौतुक केलं जात आहे.
कविता या रामगड जिल्ह्यातील दुलमी प्रखंडातील सोसो गावच्या रहिवासी आहेत. त्या विधवा असून दोन लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या भविष्यासाठी त्या झटत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडे धावण्यासाठी लागणारे स्पोर्ट्स शूज किंवा ट्रॅकसूटही नव्हते. त्यामुळे रोजच्या कपड्यांमध्येच त्या सराव करत होत्या.
होमगार्डची नोकरी मिळवून मुलांचं भविष्य घडवायचंय आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचाय याच उद्देशाने त्या रोज पहाटे चार वाजता उठून धावण्याचा सराव करतात. गावातील रस्त्यांवर आणि उपलब्ध जागेत तयारी करत होत्या. रामगडच्या सिद्धो-कान्हू मैदानावर होमगार्ड भरतीपूर्वी ट्रायल रन आयोजित करण्यात आली होती. इतर उमेदवार ट्रॅकसूट आणि स्पोर्ट्स शूज घालून मैदानात उतरले होते. कविता मात्र साडी नेसून आणि चप्पल काढून अनवाणी धावण्यासाठी तयार झाल्या. सुरुवातीला घाबरलेल्या आणि संकोचलेल्या अवस्थेत त्या होत्या. पण धावायला सुरुवात करताच त्यांनी पूर्ण अंतर सहा मिनिटांत पार केलं. त्यांच्या या कामगिरीनंतर मैदानावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं.
रामगड जिल्ह्यात होमगार्डच्या २८४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत. तसेच विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी अतिरिक्त ५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. त्यामुळे कविता यांच्यासारख्या महिलांसाठी या भरतीतून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.