🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नेत्याचा परदेशात ८ कोटींचा दरोडा अन् भारतात थेट निवडणूक! वर्षांनंतर ऑडिओ क्लिपमुळे बिंग फुटले

भाजप नेत्याचा परदेशात ८ कोटींचा दरोडा अन् भारतात थेट निवडणूक! वर्षांनंतर ऑडिओ क्लिपमुळे बिंग फुटले


कोझिकोड: केरळमधील कोझिकोड येथे भाजपच्या एका नेत्याने कतारमध्ये झालेल्या सुमारे 8 कोटी रुपयांच्या लुटीप्रकरणी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळमधील चार जण कतारला गेले होते. तेथे इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) शी संबंधित केरळ मुस्लिम कल्चरल सेंटरच्या (KMCC) कार्यालयात ठेवलेली रोकड लुटून ते भारतात परतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात जवळपास वर्षभर कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र भाजपचे नेते परप्पिल बालकृष्णन यांनी पोलिसांसमोर हजेरी लावल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. बालकृष्णन यांनी बुधवारी कोइलांडी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. ते व्यवसायाने वेल्डर असून गेल्या वर्षी कोइलांडी नगरपालिकेच्या एका प्रभागातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती.

अटकेपूर्वी बालकृष्णन यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये त्यांनी दावा केला की, ते अन्य तीन जणांसोबत कतारला गेले होते. तेथे त्यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला आपल्याला लुटीच्या कटाची कोणतीही माहिती नव्हती, असेही त्यांनी सांगितले.




कतारमधील दोहा येथे पोहोचल्यानंतर शाजी बॉम्बे ऊर्फ शाजहान आणि बावा यांनी त्यांना एका लॉजमध्ये नेले. तेथे त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. एके दिवशी सकाळी त्यांना कारमधून अल तुमामा परिसरातील KMCC च्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे धमकावून लॉकर तोडण्यास भाग पाडण्यात आले. लॉकर उघडल्यानंतर शाजीने त्यातील रोकड ताब्यात घेतली तर कमरू नावाची व्यक्ती त्यांना सूचना देत होती, असा दावा बालकृष्णन यांनी केला.

बालकृष्णन यांनी व्यक्त केली जीवाला धोका असल्याची भीती

बालकृष्णन यांनी सांगितले की, शाजीने त्यांच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट काढले आणि त्यानंतर ते कोझिकोड विमानतळावर पोहोचले. आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी व्हिडीओमध्ये आपल्याला जामिनावर सोडू नये, अशी विनंती केली. या प्रकरणात 15 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर लूट आणि समान हेतूने गुन्हा केल्याच्या आरोपांखाली अनेक जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

बालकृष्णन यांच्याव्यतिरिक्त राशी, सलीह, बॉम्बे शाजी, कमरुद्दीन आणि हसन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. न्यायालयाने बालकृष्णन यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे तर अन्य आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रकरणातील ऑडिओ क्लिपही व्हायरल

अन्य आरोपींची चौकशी केल्यानंतरच या घटनेबाबत संपूर्ण माहिती स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना कतारमध्ये घडली असली तरी गुन्हा केल्यानंतर आरोपी केरळमध्ये परतले. त्यामुळे येथे या प्रकरणाची नोंद करून तपास करता येऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपी बॉम्बे शाजी याने स्थानिक न्यायालयात अटकेपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र पोलिसांनी या अर्जाला विरोध केला आहे.

या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर वाद आणखी वाढला आहे. या क्लिपमध्ये शाजी आणि कमरू यांच्यात संभाषण झाल्याचा दावा केला जात आहे. लुटलेल्या रकमेतून आपला हिस्सा द्यावा, अशी मागणी शाजी करत असल्याचे या ऑडिओमध्ये ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. या ऑडिओ क्लिपचीही चौकशी सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.