सांगली :- संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभयनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित १४ वर्षीय बालक वेदांत बंडगर खून प्रकरणातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील मुख्य साथीदार, सराईत गुन्हेगार विशाल बिरुदेव चौगुले (वय ३०, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. आरोपीला पुढील कारवाईसाठी संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काय घडली होती घटना?
दिनांक ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास अभयनगर, स्टेट बँक कॉलनी येथील फिर्यादी संदीप बाळू बंडगर यांच्या घराच्या अंगणात १४ वर्षांचा मुलगा वेदांत बंडगर खेळत होता. त्यावेळी निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी वेदांतच्या डोळ्यात पिस्तूलने थेट गोळी झाडून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या धक्कादायक घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला होता.
या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.नं. २३५/२०२६, बीएनएस कलम १०३(१), १८९(४), ३३२(ए)) करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या गुन्ह्यात ‘मोक्का’ कलमांचा अंतर्भाव करण्यास मंजुरी दिली होती.
खंडेराजुरी-गुंडेवाडी रोडवर लावला सापळा
या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी विशाल चौगुले हा घटना घडल्यापासून फरार होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना फरार आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील सपोफौ सपना गराडे, पोकॉ प्रमोद साखरपे व पोकॉ ऋतुराज होळकर यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, संशयित विशाल चौगुले हा खंडेराजुरी ते गुंडेवाडी जाणारे रोडवर थांबलेला आहे. माहिती मिळताच पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पाळत ठेवली. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशाल चौगुलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतीही संधी न देता जागीच ताब्यात घेतले.
गुन्ह्याची दिली कबुली; आरोपी जन्मठेपेचा कैदी!
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने निलेश गडदे याच्यासोबत मिळून चार महिन्यांपूर्वी स्टेट बँक कॉलनी येथे बालकावर गोळी झाडून खून केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, विशाल चौगुले हा पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेला सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. उच्च न्यायालयात अपील दाखल केल्याने तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर असतानाच त्याने पुन्हा वेदांत बंडगरच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली:एलसीबी: पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, पोउपनि कुमार पाटील, सपोफौ सुभाष सूर्यवंशी, सपना गराडे, पोहेकॉ राजाराम मुळे, सुशील मस्के, संदीप नलावडे, पोकॉ प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार.सायबर पोलीस: पोकॉ कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.