भाजपने उत्तर प्रदेशातील आठ राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवार घोषित केले. या यादीतून केंद्रीय मंत्र्यांना वगळण्यात आल्यानं आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी तसेच केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. यानंतर पुन्हा त्यांची राज्यसभेवर निवड होणार नसल्यानं मंत्रिपदही जाणार हे निश्चित मानलं जात आहे.
हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा हे दोघेही उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते खासदार नसताना पुढील सहा महिने मंत्री राहू शकतात. मात्र पुढील सहा महिन्यांत भाजपला राज्यसभेची नवी जागा मिळण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे आता हरदीप पुरी आणि बीएल वर्मा हे मंत्रिमंडळात कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण पाच मंत्रिपदं रिक्त होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. तर राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांनीही मंत्रिपद सोडलंय. दुसरीकडे हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी, तर पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झालीय. दरम्यान, मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भाजपच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. एक व्यक्ती एक पद यानुसार या नेत्यांनाही मंत्रिपद सोडावं लागू शकतं.
नवरात्रीनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधी परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे. नवरात्री संपल्यानंतर हे अधिवेशन होण्याची शक्यता असून त्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.हरदीप पुरी यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पंजाबमधून एखाद्या शीख चेहऱ्याला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. अकाली दलासोबत युती झाल्यास हरसिमरत कौर बादल यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ शकते. नव्याने सोबत आलेल्या मित्र पक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. आपचे भाजपमध्ये आलेले ७ खासदार तर शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या ६ खासदारांमुळे एनडीएची ताकद वाढली. त्यामुळे आप आणि शिवसेनेलाही मंत्रिपद दिलं जाऊ शकतं.
सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात २९ कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, तर ३४ राज्य मंत्री आहेत. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळात एकण ६९ मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदल करताना आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.