🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जत तालुक्यात थरार: अनैतिक संबंधांतून पतीचा उशीने तोंड दाबून खून; ‘हार्ट अटॅक’चा बनाव रचणाऱ्या पत्नीसह प्रियकराच्या मुसक्या आवळल्या!​डफळापूर येथे २० लाखांच्या सुपारीतून रचला खूनाचा कट; LCB ची धडक कारवाई​

जत तालुक्यात थरार: अनैतिक संबंधांतून पतीचा उशीने तोंड दाबून खून; ‘हार्ट अटॅक’चा बनाव रचणाऱ्या पत्नीसह प्रियकराच्या मुसक्या आवळल्या! ​डफळापूर येथे २० लाखांच्या सुपारीतून रचला खूनाचा कट; LCB ची धडक कारवाई


जत :- पतीच्या सततच्या त्रासाला आणि अनैतिक संबंधांतील अडथळ्याला कंटाळून प्रियकराच्या मदतीने पतीचा उशीने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातील डफळापूर (परोळेकर वस्ती) येथे उघडकीस आली आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या (हार्ट अटॅक) आजाराने मृत्यू झाल्याचा बनाव रचून अंत्यसंस्कारही उरकण्यात आले होते. मात्र, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या  सतर्कतेमुळे या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी मृत पतीची पत्नी, तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या दोन मारेकऱ्यांसह विधीसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेतले आहे.

​नेमकी घटना काय?

​दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:३० ते २३ ऑगस्टच्या पहाटे १:०० वाजेच्या सुमारास डफळापूर येथील रहिवासी आप्पासो लक्ष्मण चव्हाण (वय ५०) हे घरात अचानक बेशुद्ध पडल्याची अफवा त्यांची पत्नी सुनिता आप्पासो चव्हाण व मुलीने पसरवली. उपचारासाठी जत येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नातेवाइकांनी कोणताही संशय न घेता व शवविच्छेदन न करताच धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार उरकून घेतले.


​असा उघडकीस आला बनाव
​आप्पासो चव्हाण यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा खून झाल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार अमिरशा फकीर व संदीप नलावडे यांना मिळाली. या बातमीच्या आधारे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सह. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ​संशयित गंगाधर रामू तेली यास ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
​२० वर्षांची मैत्री, प्रेमसंबंध आणि १ लाखाची सुपारी!

​गंगाधर तेली हा मयत आप्पासो चव्हाण यांचा वर्गमित्र होता. गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे असल्याने आप्पासो यांची पत्नी सुनिता हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. या संबंधांची माहिती मिळताच आप्पासो यांनी पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

​"एक तर मी मरते किंवा त्याला तरी मार," असा तगादा सुनिताने प्रियकराकडे लावला. यानंतर गंगाधरने आप्पासो यांचा काटा काढण्यासाठी १,००,००० रुपयांची सुपारी देऊन विक्रांत सर्जेराव चव्हाण (वय २३) व प्रतीक लक्ष्मण मोकाशी (वय २६) (दोघे रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) यांना कटामध्ये सामील करून घेतले.

​रात्रीच्या अंधारात घरात घुसून निर्घृण हत्या
​२२ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास गंगाधर, विक्रांत आणि प्रतीक हे तिघे घरात घुसले. प्रतीकने आप्पासो यांचे पाय धरले, विक्रांतने दोन्ही हात घट्ट पकडले आणि प्रियकर गंगाधर तेली याने चेहऱ्यावर उशी दाबून आप्पासो यांचा श्वास गुदमरवून खून केला. या संपूर्ण प्रकारात पत्नी व मुलीने साथ दिली.
​आरोपींवर गुन्हे दाखल, जत पोलिसांत गुन्हा नोंद

​या प्रकरणी मयताचे नातेवाईक राजू उर्फ मनोजकुमार तानाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७१/२०२६ (आर्म ॲक्ट ३, २५ व खुनाचे कलम) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​अटक करण्यात आलेले आरोपी:
१) गंगाधर रामू तेली (वय ५०, रा. डफळापूर)
२) विक्रांत सर्जेराव चव्हाण (वय २३, रा. कोकळे)
३) प्रतीक लक्ष्मण मोकाशी (वय २६, रा. कोकळे)
४) सुनिता आप्पासो चव्हाण (वय ४०, मयताची पत्नी)
५) विधीसंघर्षग्रस्त बालिका (मयताची मुलगी)

​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार आणि सायबर पोलीस ठाण्यासह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.