सांगली पोलिसांची मोठी कामगिरी! कामेरीत एकाच रात्रीत ५ घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; १०.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत:, सांगली LCB ची कारवाई
सांगली :- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी गावात एकाच रात्रीत ५ बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीचा म्होरक्यास गजाआड केले असून, त्याच्याकडून तब्बल १० लाख ६७ हजार ५५० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास कामेरी गावात एकाच रात्रीत ५ वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. संतोष खाशेराव परीट, बाबु नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्वला गजानन जाधव आणि सारीका राजेंद्र सोनावले यांच्या घरांचे दरवाजे उचकटून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरूण पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पाचवा मैल चौक (तासगाव-ईश्वरपूर विभाग) येथे सापळा रचून सराईत गुन्हेगार प्रविण राजा शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत घरफोडीसाठी वापरण्यात येणारी अवजारे (दोन लोखंडी कटावणी), रोख रक्कम आणि लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले.
आरोपींची माहिती व पार्श्वभूमी
पोलिसांच्या चौकशीत मुख्य आरोपी प्रविण राजा शिंदे (वय ३५, रा. गणेशवाडी रोड, वडुज, ता. खटाव, जि. सातारा) याने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने कामेरी येथे चोरी केल्याची कबुली दिली.
अटक आरोपी: प्रविण राजा शिंदे (वय ३५)
परागंदा (फरार) आरोपी: १) आर्यन कान्हा काळे (रा. फडतरवाडी, ता. खटाव, जि. सातारा), २) अजय लायन्या शिंदे (रा. फडतरवाडी, ता. खटाव, जि. सातारा). फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी प्रविण शिंदे व त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सातारा व सांगली जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
दोन लोखंडी कटावणीरोख रक्कम: २००/- रुपयेसोन्याचे व चांदीचे दागिने: १०,६७,३५०/- रुपयेएकूण जप्त मुद्देमाल: १०,६७,५५०/- रुपयेसदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे करत आहेत.पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक संदिप पाटील, सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, हरीश्चंद्र गावडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ईश्वरपूर पोलीस ठाणे तसेच सायबर सेलच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.