माध्यान्ह आहार सहायक संचालिका लाच घेताना जाळ्यात; 15 हजार घेताना रंगेहात पकडले, लोकायुक्तांची धडक कारवाई
यमकनमर्डी (जि. बेळगाव) : माध्यान्ह आहार योजनेच्या मागील कालावधीतील कॅशबुकमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना हुक्केरी तालुक्यातील अक्षरदासोह योजनेच्या सहायक संचालिका सविता हलकी या लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्या.
हुक्केरी तालुक्यातील शिप्पूर येथील हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून सेवा बजावलेले आणि सध्या बेळगाव तालुक्यातील मुत्नाळ हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले पी. एम. हेज्जे यांच्याकडून माध्यान्ह आहार योजनेच्या मागील कालावधीतील कॅशबुक दुरुस्त करून देण्यासाठी सविता हलकी यांनी १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती, असे सांगण्यात येते. यासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाली होती.
गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून सहायक संचालिका हलकी यांना पकडले. लोकायुक्त निरीक्षक व्यंकटेश यडहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सध्या लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.