मुंबई पोलीस दलातून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद नाईक असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात विनयभंग आणि लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, महिला पोलिसावरच अशाप्रकारे तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महिला पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
शारीरिक सुखाची मागणी करून मानसिक त्रास
पीडित महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हवालदार आनंद नाईक हा गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांवरून पीडित महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करत होता. इतकेच नव्हे तर, आरोपीने वारंवार शारीरिक सुखाची मागणी करून प्रचंड त्रास दिला. खाकी वर्दीतीलच सहकाऱ्याकडून असा सततचा त्रास सहन करावा लागल्याने अखेर पीडित महिला कॉन्स्टेबलने धैर्याने पुढे येत ताडदेव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
ताडदेव पोलिसांकडून गुन्हा दाखल
महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीची गंभीर दखल घेत ताडदेव पोलिसांनी हवालदार आनंद नाईक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये विनयभंग, लैंगिक छळ आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलातीलच एका जबाबदार कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावर अशाप्रकारचा अत्याचार केल्यामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.