🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिवाभावाचा सोबती गेला... मालकाच्या मृत्यूनंतर 'पाखऱ्या' बैलाचाही करुण अंत; २७ वर्षांच्या अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी कहाणी!

जिवाभावाचा सोबती गेला... मालकाच्या मृत्यूनंतर 'पाखऱ्या' बैलाचाही करुण अंत; २७ वर्षांच्या अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी कहाणी!


सातारा : माणूस आणि मुक्या प्राण्यातील नातं किती घट्ट असू शकतं, याची हृदयस्पर्शी प्रचिती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड येथे आली आहे. तब्बल २७ वर्षे जीवापाड जपलेल्या मालकाच्या निधनानंतर अवघ्या २४ तासांत 'पाखऱ्या' या बैलाचाही मृत्यू झाला. 



मालक आणि बैलाच्या या अतूट नात्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने खोत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अण्णासाहेब खोत यांचे शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. मात्र, या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रविवारी (ता. १ नोव्हेंबर) दुपारी त्याच सुमारास पाखऱ्यानेही अखेरचा श्वास घेतला. मालकाच्या निधनानंतर अवघ्या २४ तासांत पाखऱ्याचा मृत्यू झाल्याने या घटनेने गावकऱ्यांनाही भावूक केले.


चार महिन्यांच्या वासरापासून २७ वर्षांचा जिव्हाळा

अण्णासाहेब खोत यांनी पाखऱ्याला केवळ जनावर म्हणून कधीच पाहिले नाही. अवघ्या चार महिन्यांचा असताना त्याला दूध पाजून स्वतःच्या हाताने वाढविले. त्याचे संगोपन, खाण्यापिण्याची काळजी आणि बैलगाडी शर्यतीसाठी प्रशिक्षण देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत खोत यांचा जीव गुंतला होता. तब्बल २७ वर्षांच्या सहवासात मालक आणि पाखऱ्या यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पाखऱ्याचा दबदबा

बैलगाडी शर्यतींच्या मैदानातही पाखऱ्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक शर्यतींमध्ये त्याने सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचा वेग आणि ताकद पाहता त्याच्याशी स्पर्धा करू शकेल असा जोडीदार मिळविणेही अनेकदा आव्हानात्मक ठरत असे. मात्र, जोडीदारासोबत उत्तम जुळवून घेत पाखऱ्याने अनेक शर्यती गाजवल्या.




आज घरात पाखऱ्याने मिळविलेल्या विजयांच्या ढालींचा ढीग आहे. त्याच्या कामगिरीचा अभिमान बाळगणारे आणि कौतुकाने त्याच्या पाठीवर थाप मारणारे अण्णासाहेब मात्र आता नाहीत. ज्या मालकाने आयुष्यभर त्याला जपले, त्याच्याच जाण्यानंतर पाखऱ्यानेही जगाचा निरोप घेतल्याने या नात्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

मालक आणि मुक्या जीवाच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

अण्णासाहेब खोत आणि पाखऱ्या यांचा २७ वर्षांचा सहवास केवळ मालक आणि जनावरापुरता मर्यादित नव्हता. शर्यतीतील विजय, एकत्र घालवलेले क्षण आणि परस्परांमधील जिव्हाळा यामुळे हे नाते कुटुंबाचाच एक भाग बनले होते. 




दोन पिढ्यांनी जपलेल्या या नात्याचा असा अंत झाल्याने खोत कुटुंबीयांसह नरवाड परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत. माणसांच्या भावना शब्दांत व्यक्त होतात; पण मुक्या जीवांच्या भावना त्यांच्या वागण्यातून जाणवतात. अण्णासाहेब आणि पाखऱ्याच्या या कहाणीने माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाच्या नात्याची आठवण पुन्हा एकदा करून दिली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.