🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘द बॉय हू आस्क्ड व्हाय’ने वेधले लक्ष; नववीच्या अपेक्षाचे शिवाजी विद्यापीठात पुस्तक प्रकाशन, ‘बाबासाहेबच रोल मॉडेल’ म्हणत जिंकली मने

‘द बॉय हू आस्क्ड व्हाय’ने वेधले लक्ष; नववीच्या अपेक्षाचे शिवाजी विद्यापीठात पुस्तक प्रकाशन, ‘बाबासाहेबच रोल मॉडेल’ म्हणत जिंकली मने


कोल्हापूर :- इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने चक्क इंग्रजी भाषेत पुस्तक लिहावे आणि संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर त्याचे प्रकाशन व्हावे, ही अत्यंत कौतुकास्पद घटना कोल्हापुरात घडली आहे. 




अपेक्षा कांडर हिच्या ‘The Boy Who Asked Why’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. ​या पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनसंघर्ष आणि सामाजिक न्यायाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न अपेक्षाने केला आहे.


​“मी मराठा समाजाची, पण बाबासाहेबच माझे रोल मॉडेल!”

पुस्तक प्रकाशनानंतर अपेक्षाने अवघ्या सहा मिनिटांचे भाषण केले, ज्याने सभागृहातील प्रत्येकाला भारावून टाकले. कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासमोर बोलताना तिने आपण मराठा समाजातील असल्याचे निर्भीडपणे सांगितले. 


त्याचवेळी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच माझे रोल मॉडेल आहेत,” असे ठाम प्रतिपादन तिने केले. डॉ. आंबेडकरांच्या जीवनसंघर्षातूनच मला प्रश्न विचारण्याची आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा मिळते, असे तिने सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

​चार वर्षांच्या मेहनतीला यश

अपेक्षाच्या या यशामागे ज्येष्ठ लेखक व सेवानिवृत्त सीमा शुल्क अधिकारी मदन पवार यांचे चार वर्षांचे मार्गदर्शन आहे. अपेक्षाची वाचनाची आवड आणि लेखनक्षमता ओळखून त्यांनी तिला सतत प्रोत्साहन दिले. आपल्या या यशाचे श्रेय देत अपेक्षाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.




​दिग्गजांची उपस्थिती

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात ‘भारतीय संविधान आणि स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात हा सोहळा रंगला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, प्रा. डॉ. विकास विधाते आणि केंद्राचे संचालक प्रा. डॉ. पवन गायकवाड उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.