🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेची हातचालाखीने फसवणूक करुन सोने चोरणारा आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीची कारवाई, ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

महिलेची हातचालाखीने फसवणूक करुन सोने चोरणारा आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीची कारवाई, ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त


सांगली: आटपाडी तालुक्यातील एका महिलेला 'चोर आले आहेत, सोने पिशवीत सुरक्षित ठेवतो' असे सांगून हातचालाखीने गळ्यातील सोन्याची मोहनमाळ लंपास करणाऱ्या टोळीतील एका आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), सांगलीच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून ४३.८०० ग्रॅम वजनाची, अंदाजे ५ लाख १० हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ जप्त करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.

​गुन्ह्याची घटना व पार्श्वभूमी

फिर्यादी शारदा बबन गायकवाड (रा. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली) या १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून घरी जात होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. "परिसरात चोर आले आहेत, तुम्ही एवढे सोने घालून फिरू नका; तुमच्या गळ्यातील सोने काढून द्या, मी ते तुमच्या पिशवीत सुरक्षित ठेवतो," असे सांगून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. 



फिर्यादीने गळ्यातील मोहनमाळ काढून दिली असता, ती पिशवीत न ठेवता हातचालाखीने स्वतःकडे घेऊन तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​एलसीबीची सापळा रचून कारवाई

मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.



​२१ नोव्हेंबर २०२६ रोजी पथकातील अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर आणि नागेश खरात यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आटपाडी येथील गुन्ह्यातील एक संशयित सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात, जी.ए. कॉलेज गेटसमोर येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

​आरोपीची कबुली व जप्ती

ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव तुषार मनोज वाघोरे / वाघीरे (वय ३१, रा. शिवाजीनगर, महात्मा गांधी वसाहत, ता. व जि. पुणे) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता पँटच्या उजव्या खिशात ४३.८०० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ आढळून आली. चौकशीत त्याने मित्र शब्बीर मिस्कीन इराणी आणि जाफर बेग (दोघे रा. परळी, जि. बीड) यांच्यासोबत मिळून आटपाडी येथे महिलेची हातचालाखीने फसवणूक करून मोहनमाळ लांबवल्याची कबुली दिली व ती माळ मित्रांनी ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले.



​पुढील तपास आटपाडी पोलिसांकडे

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी पंचासमक्ष ५,१०,००० रुपये किमतीची मोहनमाळ जप्त केली आहे. अटक आरोपी तुषार वाघोरे याला व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. फरार आरोपी शब्बीर इराणी आणि जाफर बेग यांचा शोध सुरू असून, पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्यासह एलसीबीच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.