🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींच्या नावाची 'मेटा'ला दहशत? फेसबुक-इन्स्टाग्रामवर पोस्ट ब्लॉक होत असल्याचा आरोप; युवक काँग्रेसची थेट हायकोर्टात धाव!

राहुल गांधींच्या नावाची 'मेटा'ला दहशत? फेसबुक-इन्स्टाग्रामवर पोस्ट ब्लॉक होत असल्याचा आरोप; युवक काँग्रेसची थेट हायकोर्टात धाव!


नवी दिल्ली : सोशल मीडियावर राहुल गांधी यांचे नाव आणि फोटो असल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पोस्ट थेट ब्लॉक केल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. याविरोधात इंडियन यूथ काँग्रेसचे  राष्ट्रीय सचिव मनु जैन  यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सोशल मीडियाशी संबंधित एका नियमाला आव्हान दिले आहे.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आणि डिजिटल माध्यमांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम चालवणारी कंपनी मेटा  राहुल गांधी यांचे नाव आणि फोटो यांना आधार मानून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या पोस्ट ब्लॉक करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. 



मनु जैन हे यूथ काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख असून, पक्षाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटही सांभाळतात. 29 सप्टेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्यांच्या पोस्ट भारतात पाहता येणार नसल्याच्या नोटिसा मिळाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

: निमंत्रण, शुभेच्छा आणि श्रद्धांजलीच्या पोस्टही ब्लॉक?

याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार, ब्लॉक करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये कोणतीही बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह बाब नव्हती. त्यामध्ये राहुल गांधी यांना निमंत्रण देणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहणे आणि कार्यकर्त्यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो यांचा समावेश होता.



तसेच, राहुल गांधी यांनी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये (Chicago University) दिलेल्या भाषणाशी संबंधित पोस्टही ब्लॉक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व पोस्टमध्ये केवळ एकच गोष्ट समान होती, ती म्हणजे त्यांमध्ये राहुल गांधी यांचे नाव किंवा फोटो होते, असा दावा याचिकेत केला आहे.

: आयटी नियम 4(4) आणि ॲडव्हायझरीला आव्हान

मेटाने कोणतेही स्पष्ट कारण न देता या पोस्ट ब्लॉक केल्याचा आरोप असून, कोणत्या सरकारी आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, हेही स्पष्ट केलेले नाही. या याचिकेतून माहिती तंत्रज्ञान नियमांच्या (IT Rules 2021) नियम 4(4) ला आव्हान देण्यात आले आहे. या नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांना आधीच ब्लॉक केलेल्या कंटेंटशी मिळत्याजुळत्या पोस्ट ओळखून त्या आपोआप काढून टाकण्याची यंत्रणा उभारावी लागते. 

या नियमामुळे सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. योग्य कारण आणि माहिती न देता पोस्ट ब्लॉक करणे चुकीचे असून, ते सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.




कोणते आदेश आणि कीवर्ड वापरले?

याचिकाकर्त्याने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (IT Ministry) 8 आणि 10 ऑक्टोबरच्या ॲडव्हायझरीलाही आव्हान दिले आहे. राहुल गांधी यांचे नाव आणि फोटो असलेल्या पोस्ट ब्लॉक करण्यासाठी कोणते सरकारी आदेश आणि कोणते कीवर्ड्स वापरण्यात आले, याचा खुलासा केंद्र सरकार आणि मेटाने उच्च न्यायालयात करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.