धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीकारक पोस्ट आणि मानसिक त्रासाला कंटाळून धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या महिला महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या महापौरांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महापौर मायादेवी परदेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात होता. या पोस्टमुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. या सततच्या बदनामीला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी संजय शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यामागील नेमकी कारणे आणि संबंधित व्यक्तीची भूमिका तपासली जात आहे.
महापौरांच्या समर्थनार्थ महिलांचा भव्य निषेध मोर्चा
या घटनेचे पडसाद आता धुळे शहरात उमटू लागले आहेत. महापौरांच्या बदनामीकारक पोस्टविरोधात शहरातील महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज धुळे शहरात मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. भाजप आमदार अनुप अग्रवाल हेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते.
महिला लोकप्रतिनिधींची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी,अशी भूमिका मोर्चादरम्यान मांडण्यात आली.
या घटनेमुळे धुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, पोलीस तपासातून आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.