गोकुळच्या अध्यक्षपदावरुन कोल्हापूरमधील नेत्यांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीच्या राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
बंटी पाटील तू बंटीच राहिलास, तू कधी बंटी साहेब झालाच नाहीस. तुमच्या प्रॉपर्टीत इतकी वाढ कशी झाली? बंटी पाटलांना त्यांच्या कुटुंबात सर्वात श्रीमंत व्हायचे आहे. एकेकाळी त्यांचे वडील डी.वाय.पाटील कोल्हापूरमध्ये स्कुटरवरुन फिरायचे.
मग आता बंटी पाटलांकडे इतकी संपत्ती कुठून आली? मलई खाण्यासाठीच त्यांना गोकुळची सत्ता हातात हवी आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरुन शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.
सतेज पाटील यांचे वडील डी. वाय. पाटील स्कुटरवर फिरायचे, ते ठीक आहे. पण महाराष्ट्राने तुमची परिस्थितीही बघितली आहे. तुम्ही शबनम झोळी घेऊन हॉटेलच्या बाहेर वाट पाहत बसायचात. कोणीतरी हॉटेलच्या आत नेऊन चहा पाजतंय का, यासाठी तुम्ही वाट बघायचात. तुमची परिस्थितीही या महाराष्ट्राने बघितली आहे ना. तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का?, असा खोचक सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. मी चंद्रकांत दादांचं भाषण ऐकलं, हे सगळं नळावरच्या भांडणासारखं चाललंय. मी ह्याव करेन, त्याव करेन. काय चाललंय, तुम्ही दमदाटी करताय.
हे किती दिवस आहे, तुमची सत्ता पण जाणार आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. सत्ता ही कोणाची मांडलिक नाही, कोणाच्या दारात थांबत नाही , आज इथे उद्या तिकडे असते. कधीतरी लोक चौकाचौकात मनगट धरणार आहेत तुमचं, तेव्हा तुम्हाला उत्तर देताना नाकीनऊ येईल. केसं एका बाजूला राहील, धोतर एका बाजूला राहील, चष्मा एका बाजूला राहील, तो काळ फार लांब नाही जवळचा आहे. दमदाटी केली नाही पाहिजे, ही लोकशाही आहे, हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.