महाराष्ट्रात गोकुळच्या मुद्यावरुन राजकारण तापत चाललं आहे. काल राज्य सरकारने गोकुळमध्ये पाच शासकीय सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही वाचवण्याची गरज आहे असं विरोधकांकडून प्रचार सुरु आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील महत्वाचा दूध संघ असलेल्या गोकुळची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या, तर महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या. निसटतं बहुमत हे सतेज पाटील यांच्या आघाडीकडे आहे.
त्यामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीकडून गोकुळचं अध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आता राज्य सरकारने गोकुळवर पाच शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला.यात चार राजकीय आणि एक शासकीय संचालक असणार आहे. या संचालकांना मतदानाचा अधिकार असणार आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्याकडे बहुमत असूनही त्यांच्या आघाडीचा पराभव होऊ शकतो.
सरकारच्या या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली व 9 नोव्हेंबरला संघर्ष मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. “हा कोल्हापूरकरांचा अपमान, रस्त्यावर उतरावं लागेल” असं सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान या सगळ्या वादात आता उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना फोन केला आहे. “गोकुळच्या लढाईत ठाकरे गट सतेज पाटील यांच्या पाठीशी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत” असं उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेची वेगळी भूमिका
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा गोकुळवर शासन नियुक्त सदस्य नेमण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. “कोरम पूर्ण झाला नाही तर निवडणूक रद्द होईल. कोरम पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक घेतलीय. आम्ही कोर्टात बाजू मांडू” अशी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महायुतीमधील दुसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र हा निर्णय मान्य नाहीय. गोकुळमध्ये चार शासन नियुक्त सदस्य निवडीवर शिवसेना नाराज आहे. जनतेचा कौल मान्य केला पाहिजे अशी एकनाथ शिंदे शिवसेनेची भूमिका आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.