🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"शासन बळीराजासोबत!" मंत्री पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरा केला फराळाचा आनंद

"शासन बळीराजासोबत!" मंत्री पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरा केला फराळाचा आनंद


सांगली : दुष्काळात शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे असा विश्‍वास राज्याचे उच्च शिक्षण व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत राज्य शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. 




या अनुषंगाने प्रत्यक्ष शेतकर्‍यांना दिलासा व विश्वास देण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव योगश्रमात शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.


यावेळी आमदार धैर्यशील कदम, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जतचे उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, बालगाव योगाश्रमाचे अमृतानंद स्वामीजी महाराज आदींसह परिसरातून आलेले शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, अल निनोमुळे उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीत शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये. पीकपंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येईल. तोपर्यंत दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्य शासनाकडून रक्कम रुपये पाच हजारांची मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात येईल. 




याबरोबरच जतचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार व जिल्हाधिकारी यांनी दोन स्वतंत्र बैठका घ्याव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले. त्याचवेळी पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा व त्याबाबत जनजागृतीही करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. प्रशासनाने हाती घेतलेल्या रिचार्ज शाफ्टच्या एकूण कामांपैकी ९० टक्के काम तसेच, जल जीवन मिशनचीही २५ टक्के काम जत तालुक्यात आहे. मागेल त्याला टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या आवर्तनात जत तालुक्यातील तलाव प्राधान्याने भरुन घेण्यात येतील. याशिवाय शासकीय जमिनीवर चारा लागवडीसाठी बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. 




यावेळी पालकमंत्री पाटील यांनी थेट जमिनीवर बसून शेतकरी बांधवांसोबत फराळ केला. प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी बांधवास लाडू भरवून दिलासा दिला. उपस्थितापैकी एका शेतकर्‍यानेही पालकमंत्री यांना फराळ भरवून कृतज्ञता व्यक्त केली. प्रारंभी विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.