🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऐतिहासिक निर्णय! दादर स्थानकाची ओळख बदलणार; आता 'चैत्यभूमी रेल्वे स्थानक' म्हणून ओळखले जाणार, मुख्यमंत्र्यांचा मोठा धमाका

ऐतिहासिक निर्णय! दादर स्थानकाची ओळख बदलणार; आता 'चैत्यभूमी रेल्वे स्थानक' म्हणून ओळखले जाणार, मुख्यमंत्र्यांचा मोठा धमाका


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सुरक्षा, आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छतेच्या उत्तम व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

विधानभवन येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत दादर रेल्वे स्थानकाला 'चैत्यभूमी' असे नाव देण्याच्या प्रक्रियेला विधिमंडळ अधिवेशनात गती दिली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




दादर रेल्वे स्थानकाला 'चैत्यभूमी' हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात

दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.




इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे

महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.




वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात ऑटोरिक्षांना प्रवेशाची मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे, याची तपासणी करून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य कायम राखणे आवश्यक असून, या दिवशी उत्सवी स्वरूपाचे आयोजन टाळण्यात यावे. हा दिवस दुःखाचा असल्याने उत्सवी स्वरूपाच्या कार्यक्रमाऐवजी अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट अथवा त्यांच्या विचारांशी सुसंगत अन्य उपक्रम आयोजित करता येतील का, याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.