पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या ताफ्याला आंदोलकांनी घेराव घालत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी मोईत्रा यांच्या गाडीवर अंडी फेकली, काठ्या आणि झाडू दाखवत 'गो बॅक'च्या घोषणा दिल्या.
या संपूर्ण गोंधळाचे महुआ मोईत्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून थेट प्रक्षेपण केले असून, पूर्वसूचना देऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नेमकी घटना काय?
महुआ मोईत्रा गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कृष्णनगरहून कालीगंज येथे जात होत्या. कालीगंजमधील गोबरा पंचायत परिसरात त्यांचा ताफा पोहोचला असता आंदोलकांच्या एका गटाने त्यांना घेराव घातला. आंदोलकांच्या हातात काळे झेंडे आणि भाजपाचे ध्वज होते.
जमावाने गाडीला धक्काबुक्की सुरू केल्याने मोईत्रा यांना गाडीतच अडकून रहावे लागले. हा प्रकार सुरू असताना मोईत्रा यांनी गाडीच्या आतूनच घटनेचे थेट प्रक्षेपण सुरू केले. "माझ्यावर जमावाने हल्ला केला आहे. ते माझ्या गाडीला धक्का मारत आहेत. ही अंडी बघा," असे त्या व्हिडिओमध्ये ओरडताना ऐकू येत आहेत.
पोलिसांच्या भूमिकेवर संताप
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोईत्रा यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेवेळी पोलीस पूर्णपणे हतबल ठरल्याचा दावा मोईत्रा यांनी केला. "पोलिसांना या संभाव्य हल्ल्याची सर्व माहिती देऊनही त्यांनी भाजपाच्या जमावाला इथे येऊ दिले. पोलीस जमावाला पांगवण्याऐवजी मलाच तिथून निघून जाण्यास सांगत आहेत. माझ्यासोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी काहीच करू शकत नाहीत," अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावरून दिली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही टॅग करत घटनेकडे लक्ष वेधले.
भाजपाचे प्रत्युत्तर: 'अंडीच फेकली, बॉम्ब नाही'
या घटनेवर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या नदिया जिल्ह्याचे माध्यम संयोजक संदिपान मजुमदार यांनी या आंदोलनाचे समर्थन केले. "तृणमूल सत्तेत असताना महुआ मोईत्रा यांनी ज्या प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान केला, त्याविरोधात सत्ताबदलानंतर सर्वसामान्य जनतेचा हा उत्स्फूर्त उद्रेक आहे. त्यांच्यावर बॉम्ब तर फेकले नाहीत, फक्त अंडीच फेकली आहेत. त्यांनी जे कृत्य केले आहे, ते पाहता त्यांना इतके तर सहन करावेच लागेल," असे मजुमदार यांनी म्हटले आहे.
सुरक्षेचा वाद न्यायप्रविष्ट
महुआ मोईत्रा यांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत कृष्णनगर मतदारसंघातील दौऱ्यांदरम्यान मोईत्रा यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस हवालदार तैनात ठेवण्यात आले आहेत.
यापूर्वीही घडल्या होत्या अशा घटना
मोईत्रा यांच्यावर अंडी फेकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी तेहट्टा येथील पक्षाच्या बैठकीतून बाहेर पडताना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीवर अंडी फेकली होती. याप्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मोईत्रा यांनी २१ सप्टेंबर रोजी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, १ जुलै रोजीही कृष्णनगरमधील कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला होता; मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ही कृत्ये भाजपाच्या संस्कृतीचा भाग नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.