अतिरेक नडला! रील्सच्या नादात संभाजीनगरच्या आजी थेट हॉस्पिटलमध्ये; मोबाईल हिसकावताच केला 'हा' भयंकर प्रताप!
छत्रपती संभाजीनगर: स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचे व्यसन आता तरुणांपुरते मर्यादित राहिलेले नसून, त्याचा विळखा आता समाजातील प्रत्येक वयोगटाला विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनाही बसत असल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील ७५ वर्षीय आजीबाईंना इन्स्टाग्राम रील्सचे इतके गंभीर व्यसन जडले की, त्यांना उपचारासाठी तब्बल १५ दिवस रुग्णालयात ठेवावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या आजीबाईंना काही दिवसांपासून स्मार्टफोन वापरण्याची आणि इन्स्टाग्रामवर तासन् तास 'रील्स' (Reels) पाहण्याचे प्रचंड व्यसन लागले आहे. ही सवय एवढी वाढली की, त्यांना जेवणाचे, पाण्याची तहान लागल्याचे किंवा इतर दैनंदिन व्यवहारांचेही भान उरले नाही. त्या दिवसरात्र मोबाईलमध्येच मग्न असत. कुटुंबीयांनी आजीबाईंच्या या वाढत्या व्यसनामुळे त्रस्त होऊन अखेर त्यांचा मोबाईल त्यांच्याकडून काढून घेतला. मोबाईल हातातून जाताच आजीबाई अत्यंत अस्वस्थ झाली.
त्यांनी घरात आदळआपट सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मनोविकारतज्ज्ञांकडे दाखल केले.
आजीबाई रुग्णालयात दाखल आणि मोबाईल चोरीचा धक्कादायक प्रकार
रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आजीबाईंवर उपचार सुरू करण्यात आले. तब्बल १५ दिवस चाललेल्या उपचारानंतर आणि समुपदेशनानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात एक वेगळाच प्रकार घडला.
रुग्णालयातील इतर रुग्णांचे मोबाईल अचानक गायब होऊ लागल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने संशय आल्याने सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. सीसीटीव्ही तपासणीत जो प्रकार समोर आला, त्याने सगळेच अवाक् झाले; खुद्द त्या ७५ वर्षीय आजीबाईंनीच उपचारादरम्यान रुग्णालयातील इतर पाच जणांचे मोबाईल चोरून स्वतःच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे उघड झाले. मोबाईलचे व्यसन किती टोकाला जाऊ शकते, याचे हे एक ज्वलंत उदाहरण ठरले.
मानसोपचारतज्ज्ञांचा गंभीर इशारा
या घटनेनंतर बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी पालकांना आणि कुटुंबीयांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, आजकाल डिजिटल व्यसन केवळ तरुणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. वृद्धांमध्ये एकटेपणा किंवा इतर कारणांमुळे मोबाईलचा अतिवापर वाढताना दिसत आहे. या व्यसनाकडे आता गांभीर्याने पाहण्याची आणि ज्येष्ठांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे.
डिजिटल क्रांतीने आपल्याला अनेक सुविधा दिल्या आहेत, परंतु या तंत्रज्ञानाचा अतिवापर मानवी मनावर आणि वर्तनावर कसा विपरीत परिणाम करू शकतो, याचे हे प्रकरण डोळ्यात अंजन घालणारे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.