परभणी जिल्हा परिषदेत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत एका कला शिक्षकाला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे, ही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वीकारल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे अतिरिक्त पदभार असलेले संदीप घोन्सीकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराच्या पत्नीने ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील १२ लाख ४६ हजार ४९८ रुपये थकीत वेतन मंजूर झाले होते.
मात्र, ही रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील लिपिक शेख असलम यांनी थकीत वेतनाच्या १५ टक्के म्हणजेच १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची २० नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी मोबाईल संभाषणातून शेख असलम यांनी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर २६ नोव्हेंबर रोजी परभणी बसस्थानक परिसरातील मिलन ऑप्टिकल्ससमोर एसीबीने सापळा रचला. यावेळी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास शेख असलम यांनी तक्रारदाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारल्यानंतर शेख असलम यांना एसीबी कार्यालयात आणण्यात आले. यावेळी पंचांसमक्ष चौकशी केली असता, ही रक्कम वरिष्ठ अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर शेख असलम यांनी पंचांसमक्ष घोन्सीकर यांना मोबाईलवर फोन करून १ लाख ८० हजार रुपये स्वीकारल्याची माहिती दिली आणि ही रक्कम कुठे आणून द्यायची, अशी विचारणा केली. त्यावर घोन्सीकर यांनी पैसे घरी घेऊन येण्यास सांगितल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर आणि कला शिक्षक शेख असलम शेख रज्जाक या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.