🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणांमध्ये वाढतोय आतड्याच्या कॅन्सरचा धोका; आहारातील 'या' सवयी तात्काळ बदला, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

तरुणांमध्ये वाढतोय आतड्याच्या कॅन्सरचा धोका; आहारातील 'या' सवयी तात्काळ बदला, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान


एकेकाळी मोठ्या आतड्याचा कर्करोग (कोलोरेक्टल कॅन्सर) हा प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींमध्ये आढळणारा आजार मानला जात होता. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसत आहे.  विशेष म्हणजे, तरुण वयातही या कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. 



बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आरोग्याचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थही यामागे कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे वेळीच आहारात बदल करणे आणि शरीराने दिलेल्या संकेतांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तरुणांमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण का वाढतेय?

मोठ्या आतड्याचा कर्करोग म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सर हा मोठे आतडे आणि मलाशयाच्या भागात होणारा कर्करोग आहे. पूर्वी हा आजार साधारणपणे ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये अधिक आढळत असे. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये कमी वयाच्या व्यक्तींमध्येही या आजाराचे निदान होत असल्याचे दिसून येत आहे.




याबाबत ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी के. गुप्ता यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, गेल्या ३० वर्षांमध्ये जगभरातील तरुण प्रौढांमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये या कर्करोगाच्या नव्या रुग्णांपैकी जवळपास पाचपैकी एक रुग्ण आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हा बदल आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.


पोटातील चांगल्या जीवाणूंचे संतुलन बिघडतेय?

या समस्येमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आतड्यांमधील जीवाणूंचे बदलते संतुलन. आपल्या पचनसंस्थेत असंख्य सूक्ष्म जीवाणू असतात. त्यांना गट मायक्रोबायोम असे म्हणतात. हे जीवाणू पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासह शरीराच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. 




मात्र, आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असणे, प्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार खाणे आणि प्रतिजैविक औषधांचा वारंवार वापर, यामुळे या जीवाणूंच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. काही संशोधनांमध्ये ई. कोलाई आणि फ्युसीबॅक्टेरियम न्यूक्लिएटम या जीवाणूंच्या विशिष्ट प्रकारांचा मोठ्या आतड्याच्या कर्करोगाशी संबंध आढळला आहे, त्यामुळे आतड्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे ठरते.

ताटातील ‘या’ पदार्थांमुळे वाढू शकतो धोका!

आपल्या आहारात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता अनेक जण घरगुती आणि ताज्या अन्नापेक्षा प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेये आणि अधिक उष्मांक असलेल्या पदार्थांना प्राधान्य देतात. आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाणही कमी होत आहे. 

डॉ. गुप्ता यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर केलेल्या संशोधनांमध्ये अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे अधिक सेवन आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा वाढलेला धोका यांच्यात संबंध आढळला आहे. विशेषतः पुरुषांमध्ये हा संबंध अधिक ठळकपणे दिसून आला आहे.

त्यामुळे आहारातील पुढील गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

अतिप्रक्रिया केलेले पदार्थ : पॅकेटबंद खाण्याचे पदार्थ आणि औद्योगिक प्रक्रियेतून तयार केलेले पदार्थ यांचे वारंवार सेवन टाळावे.

साखरयुक्त पेये : शीतपेये आणि अतिरिक्त साखर असलेल्या पेयांचे सेवन मर्यादित ठेवावे.

कमी तंतुमय आहार : आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा.

अधिक उष्मांक असलेले पदार्थ : गरजेपेक्षा जास्त उष्मांक असलेले पदार्थ वारंवार खाणे टाळावे.

लठ्ठपणा आणि मधुमेहाचाही धोका!

केवळ चुकीच्या आहारामुळेच हा धोका वाढतो असे नाही, तर शरीराचे वाढलेले वजन आणि चयापचयाशी संबंधित समस्याही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह, इन्सुलिन प्रतिरोध आणि शारीरिक हालचालींचा अभाव असलेल्या व्यक्तींमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका अधिक असू शकतो.

या परिस्थितींमुळे शरीरात दीर्घकाळ दाह निर्माण होऊ शकतो. तसेच इन्सुलिन आणि इन्सुलिनसदृश वाढीच्या घटकांच्या (IGF-1) पातळीत बदल होऊ शकतात. या बदलांचा कर्करोगाच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो असे संशोधकांचे मत आहे.

सुरुवातीची ‘ही’ लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका!

मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सुरुवातीला ठळक लक्षणे दिसतीलच असे नाही. मात्र, काही संकेत वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

डॉ. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

१. शौचातून रक्त जाणे : शौच करताना रक्त दिसणे किंवा शौचाचा रंग असामान्य होणे.

२. शौचाच्या सवयींमध्ये बदल : वारंवार जुलाब होणे, बद्धकोष्ठता किंवा शौचाच्या वेळेत आणि स्वरूपात सातत्याने बदल होणे.

३. विनाकारण वजन कमी होणे : आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करता वजन घटणे.

४. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय : शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊन अशक्तपणा आणि थकवा जाणवणे.

वय कमी असले तरी तपासणीकडे दुर्लक्ष नको!

तरुण वयात मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी केवळ वय कमी आहे म्हणून लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सामान्य जोखीम असलेल्या व्यक्तींसाठी तपासणीचे शिफारस केलेले वय ५० वरून ४५ वर्षे केले आहे. कुटुंबात मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा इतिहास असल्यास, आतड्यांचा दाहजन्य आजार किंवा आनुवंशिक कर्करोगाची शक्यता असल्यास त्याहून कमी वयातही तपासणीची गरज भासू शकते.

या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करणे, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेये मर्यादित ठेवणे, नियमित व्यायाम करणे आणि पचनाशी संबंधित त्रास दीर्घकाळ जाणवत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

(महत्त्वाचे : ही माहिती जनजागृतीसाठी असून वैद्यकीय निदानाचा पर्याय नाही. आहारातील एखादा पदार्थ खाल्ल्याने थेट कर्करोग होतो असे नाही. मात्र, काही आहारपद्धती आणि जीवनशैलीतील घटक कर्करोगाच्या वाढलेल्या धोक्याशी संबंधित असू शकतात. लक्षणे जाणवल्यास स्वतः उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.