सांगली सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: जामिनाच्या अटींचा भंग करणाऱ्या खुनातील दोन आरोपींचा जामीन रद्द!
सांगली :- एमआयडीसी कुपवाड पोलिसांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे गुन्हेगारांवर मोठी कायदेशीर कारवाई; जामिनावर बाहेर येऊन करत होते गुन्हेगारी कृत्ये. जामिनावर तुरुगातून बाहेर आल्यानंतर न्यायालयाच्या अटी व शर्ती पायदळी तुडवून पुन्हा गुन्हेगारी जगतात सक्रिय झालेल्या, खुनाच्या गुन्ह्यातील दोन कुख्यात आरोपींना सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी केलेल्या ठोस कायदेशीर पाठपुराव्यामुळे आरोपी निलेश विठोबा गडदे आणि किरण शंकर लोखंडे यांचा मंजूर जामीन न्यायालयाने अधिकृतपणे रद्द केला आहे. या महत्त्वपूर्ण निकालानंतर गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा नोंद क्रमांक १०३/२०२० (भारतीय दंड संहिता कलम ३०२ व इतर गंभीर कलमान्वये) हा खुनाचा गंभीर गुन्हा होता. या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक १ - निलेश विठोबा गडदे आणि आरोपी क्रमांक ५ - किरण शंकर लोखंडे यांना यापूर्वी न्यायालयाने काही विशिष्ट अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला होता.
मात्र, जामिनावर सुटल्यानंतर या दोन्ही आरोपींनी न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला. त्यांची गुन्हेगारी कृत्ये अविरत सुरूच राहिली. या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यातील एमआयडीसी कुपवाड, महात्मा गांधी चौक, संजयनगर आणि जत या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. न्यायालयाने दिलेली जामिनाची सवलत ही कायद्याच्या उल्लंघनासाठी वापरली जात असल्याचे उघड झाले.
पोलिसांची कठोर पावले आणि न्यायालयात युक्तिवाद
आरोपींकडून सतत होत असलेल्या अटींच्या भंगाची गंभीर दखल घेत, मूळ गुन्ह्यातील फिर्यादी चैतन्य सखाराम पाटोळे आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने या दोन्ही आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयात कायदेशीर अर्ज दाखल करण्यात आला.
या अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलीस व फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाने आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अटींचा झालेला उघड भंग लक्षात घेऊन दोघांचाही जामीन रद्द करण्याचे कठोर आदेश दिले.
पोलिसांचे उच्चस्तरीय मार्गदर्शन आणि विशेष टीमचे परिश्रम
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.न्यायालयात फिर्यादी चैतन्य पाटोळे यांच्या वतीने सातारा येथील अॅड. रोहित धायगुडे यांनी, तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. हिंगमिरे यांनी अत्यंत प्रभावी बाजू मांडली. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, कोर्ट पैरवी कक्ष अधिकारी सपोनि मुदस्सर शेख, पोलीस हवालदार आग्या नरुदै, निलेश कोळेकर तसेच कोर्ट पैरवी महिला पोलीस अंमलदार यास्मिन शेख व श्रुती शहा यांनी विशेष परिश्रम घेतले.थोडक्यात काय तर: जामीन मिळूनही कायद्याचा गैरवापर करणाऱ्या आणि पुन्हा गुन्हेगारीकडे वळणाऱ्या गुन्हेगारांसाठी सांगली सत्र न्यायालयाचा हा निर्णय एक कठोर संदेश देणारा ठरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.