सणासुदीच्या काळातील गर्दीमुळे कोरोना वाढण्याची शक्यता कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षितता नाही - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
- शासकीय यंत्रणांच्या लसीकरणातील योगदानाचे होणार मुल्यमापन
- जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक डोसेस
- शिक्षण परिषद पुढे ढकलली
- लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
सांगली, दि. २०, : जिल्ह्यात दि. 21 व 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. महालसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित येवून समन्वयाने काम करावे. लसीकरणाच्या कामात अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानाचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. सध्याच्या सणासुदीच्या काळात गर्दी वाढून कोरोना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षितता नाही हे लक्षात घेवून लसीकरणासाठी प्रत्येक यंत्रणेने झोकून देवून काम करावे व महालसीकरण अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महालसीकरण अभियान तयारी आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. कांबळे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व तालुका गट शिक्षणाधिकारी, सर्व नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लसीकरण मोहिमेत शिक्षकांनी स्वत:ही डोस घ्यावेत पण त्याचबरोबर आपआपल्या कार्यक्षेत्रात ज्या लोकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. या मोहिमेत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्याबरोबर आपलेही योगदान द्यावे. महालसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचा या मोहिमेसाठी सहभाग घ्यावा. जिल्ह्यामध्ये जत, आटपाडी, विटा येथे काही क्षेत्रात लसीकरण तुलनेने कमी झाले आहे तेथे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. शहरी भागात नगरपालिकांनी वॉर्डनिहाय नियोजन करून लसीकरण करणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये राबविण्यात आलेल्या लसीकरण महाअभियानात सर्वच यंत्रणांनी जिद्दीने व समन्वयाने काम केले त्यामुळे एकाच दिवशी लसीकरणाचा दीड लाखाचा टप्पा पार केला. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात सर्व यंत्रणांनी मेहनतीने व जोमाने काम करून हे अभियान यशस्वी करावे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, महालसीकरण अभियानाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी, शाळांमधील बालकांच्या पालकांची यादी उपलब्ध आहे. त्यातील किती लोकांना पहिला व दुसरा डोस झाला आहे याची माहिती शिक्षक व अंगणवाडी यंत्रणांनी संकलित करावी. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा अभियानात सहभाग करून घ्यावा. त्याचबरोबर मोहिम काळात प्रत्येक तासाला होणाऱ्या लसीकरणाचा पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ज्या गावांमध्ये 100 टक्के लसीकरण झाले आहे त्यांची माहिती जाहिरात फलकांवर लावून प्रसारीत करावी. त्यातून अन्य गावांना प्रेरणा मिळून लसीकरणाला वेग येईल. यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय राठोड यावेळी म्हणाले, ज्या शिक्षकांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. या काळातील शिक्षकांची गैरहजेरी विनावेतन करण्यात येईल. त्यासाठी ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांनी तातडीने ते करून घ्यावे. यावेळी त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षण परिषद पुढे ढकलण्यात आल्याचेही सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.