ध्वजदिन निधी संकलनास सढळ हस्ते मदत करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 7, : देशासाठी ज्यांनी असिम त्याग, बलिदान केले अशा सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यात २० हजाराहून अधिक माजी सैनिक आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेकजण सद्या सैन्यदलात सेवारत आहेत. सांगली जिल्ह्याला त्याग आणि बलिदानाची जाज्वल, दैदिप्यमान परंपरा लाभलेली असल्याचे त्यांनी गौरवउदगार काढले.
7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर (निवृत्त), निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, वीरपिता, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक व त्यांचे पाल्य, एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्यांची परतफेड कोणत्याही स्वरुपात करु शकत नाही. परंतु, त्यांच्या कुंटुंबीयांचे, त्यांच्यावरील अवलंबितांचे पुनवर्सन करून काही अंशी उतराई होवू शकतो त्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, देशप्रेम केवळ मनामध्ये ठेवू नका, जे सैनिक देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात त्यांच्यासाठी सढळ हस्ते योगदान द्या. सर्वसामान्य लोकानींही ध्वजदिन निधीसाठी भरभरून मदत करावी. यातून संकलित होणाऱ्या मदतीचा विनियोग देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या, माजी सैनिकांच्या अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी करण्यात येतो.
यावेळी त्यांनी माजी सैनिक समर्पण, जीद्द, कष्ट, प्रामाणिकता या गुणांच्या आधारे सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनातही प्रचंड यशस्वी होवू शकतात त्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व मदत प्रशासनातर्फे करण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनामुळे मध्यल्या काळात थांबविण्यात आलेले सैनिक दरबार पुन्हा भरविण्यात येतील व त्याव्दारे सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. ध्वजदिन निधी संकलनाची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येईल.
सांगली जिल्ह्याचा गतवर्षीचा इष्टांक 1 कोटी 42 लाख 39 हजार होता. त्या तुलनेत जिल्ह्याने 1 कोटी 22 लाख इतका निधी संकलित केला आहे. यावर्षीही गतवर्षी इतकाच इष्टांक असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, सर्वसामान्य जनता यांनी भरभरून मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. गतवर्षीच्या निधी संकलनामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आदि यंत्रणांचे योगदान महत्वपूर्ण आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने 30 लाख, माध्यमिक विभागाने 18 लाख 10 हजार, उप प्रादेशिक विभाग 4 लाख, अधिक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ 4 लाख, मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली 8 लाख 79 हजार, जिल्हा सैनिक कार्यालय 4 लाख 85 हजार, पोलीस विभाग 2 लाख रूपये असे निधी संकलन करून शासनाच्या अनेक विभागांनी निधी संकलनात भरीव मदत केली आहे. आज झालेल्या निधी संकलानाच्या कार्यक्रमामध्ये वैयक्तीक देणगीदार स्वानंद कुलकर्णी यांनी 50 हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला तर जयहनुमान ट्रस्टने 2 हजार 500 रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. या कार्यक्रमामध्ये 10 वी व 12 वी मध्ये उत्कृष्ट गुणप्राप्त करणाऱ्या माजी सैनिक पाल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केलेत तर आभार सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.