सीमा वाद चिघळण्याची चिन्हे; चित्रदुर्गमध्ये कन्नड गुंडांनी भगवा ध्वज जाळला, महाराष्ट्रात संतापाची लाट
बेळगाव : 'चोराच्या उलट्या बोंबा' असा प्रकार सध्या कन्नड संघटनांच्या बाबतीत होत असून, बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासल्यामुळे सीमा भागासह महाराष्ट्रात निर्माण झालेले संतापाचे वातावरण निवळत नाही तोपर्यंत चित्रदुर्गमध्ये कन्नड गुंडांनी हिंदुत्वाचे प्रतीक असलेला पवित्र भगवा ध्वज भरचौकात जाळल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य यांचा धिक्कार करत भगवा ध्वज जाळण्याचा संतापजनक प्रकार चित्रदुर्ग येथील कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या गुंडांनी केला. त्यात चार ते पाच गुंडांचा समावेश होता. यावेळी कन्नडविरोधी शिवसेनेचा धिक्कार असो, कन्नडविरोधी महाराष्ट्राचा धिक्कार असो, गुंडगिरी करणाऱ्या एमईएसचा धिक्कार असो, कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या चळवळीचा विजय असो, आदी घोषणा देण्यात येत होत्या.
महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या निषेधार्थ महामेळावा यशस्वी केला. यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर पोलीस संरक्षणात काही कन्नड गुंडांनी शाई फेकून काळे फासण्याचा निंद्य प्रकारही केला.
याच्याविरोधात समितीने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकाराचा सीमा भागासह महाराष्ट्रात तीव्र निषेध केला जात आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्येही याचे पडसाद उमटणार आहेी. या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांकडून पुन्हा एकदा बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांसह शिवसेना आणि संपूर्ण महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चित्रदुर्ग येथील प्रकारामुळे बेळगावसह सीमा भागात संतापाची लाट उसळली असून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.