'हा' माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार, मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. तसेच गायक राहुल देशपांडे यांना भारतीय संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे पार पडणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. या पुरस्काराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं, हेही त्यांनी सांगितलं.
लतादीदी तिच्या गाण्यांच्या रूपाने आपल्यासोबत आहे, ती गेलेली नाही. गायनाचे पर्व संपले तरी हा युगांत नाही तर हे 'लतायुग' सुरू झाले आहे. हे लतायुग अनेक तरूणांना प्रेरणा देणार आहे, अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वत: पंतप्रधान या पुरस्कारसाठी मुंबईत येणार आहेत.
नरेंद्र मोदी ही दिग्गज व्यक्ती आहे, ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे आहेत. त्यामुळे, मोदींनी हो म्हणावं हीच मोठी गोष्ट आहे. माझा मुलगा आदिनाथ मंगेशकरने खूप प्रयत्न केले आणि त्यांचा होकार मिळवला. मोदींनी हा पुरस्कार स्विकारला. मात्र, मी असे पुरस्कार घेत नसतो. पण, हा आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरस्कार असेल, असे मोदींनी म्हटल्याचे पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. म्हणजे, अन्य कुठल्याही संस्थांचे ते पुरस्कार घेणार नाहीत, बाकी राजकारणाचे होतीलच. पण, घोषित करुन असे पुरस्कार ते घेणार नाहीत, असेही ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदी हे दीदीला बहीण मानायचे
नरेंद्र मोदी हे दीदीला बहीण मानायचे. जेव्हा आम्ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची उभारणी केली, तेव्हा नरेंद्र मोदी हे उद्घाटनप्रसंगी आले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दीदी असे म्हणाली होती की तिची इच्छा आहे की, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे. या तिच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. लतादीदी ही सरस्वती होती आणि तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द खरे ठरले. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार द्यावा हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो. जगाच्या पाठीवर त्यांनी त्यांचे काम पोहोचवले आहे हे जगाने मान्य केले आहे, या शब्दांत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरवर्षी दिला जाणार पुरस्कार
उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न लतादीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" म्हणून ओळखला जाईल आणि तो दरवर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
