राणा दाम्पत्याबाबत गृहमंत्री वळसे पाटील थेटच बोलले
' मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत.
यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले असून हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. अद्याप राणा दाम्पत्य घराच्या बाहेर पडले नाही. पण त्यांनी आज मातोश्रीवर जाणारच असं म्हटलं आहे. यावर बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय तर राणा दाम्पत्याला हंगामा करु नका, असं म्हटलं आहे.
सर्व शिवसैनिकांना विनंती की गोंधळ करु नका. कायदा आणि सुव्यवस्था राखावी, पोलिसांना सहकार्य करावं. राणा दाम्पत्याला विनंती आहे की कुणाच्या सांगण्यावरुन विनाकारण हंगामा करु नये. त्यांनी घरातल्या घरात काय धार्मिक कार्य करायचं ते करा, कुणाच्या सांगण्यावरुन असा हंगामा नको, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.
वळसे पाटील म्हणाले की, पोलिस आपली जबाबदारी पूर्ण करतील. ते काय कारवाई करायचं ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जी योग्य पावलं उचलावी लागतील ते पोलिस उचलतात. आमदार, खासदार असले म्हणून काहीही करायला स्वातंत्र्य नाही. शांतता बिघडवणं हे कुठल्याही कायद्यात बसत नाही. आमदार, खासदारांना वाटेल तसं वागण्याचा अधिकार नाही. माझं अद्याप मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालेलं नाही. मात्र सर्वांनी शांतता राखावी, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत - जयंत पाटील
राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केले. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच बाजू बदलली आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नसल्याचे पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
