'मशिदीत हनुमान चालिसा लावून दाखवा,'शरद पवारांना भाजपचं आव्हान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीवादाचा गंभीर आरोपही केला. राज ठाकरे यांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देताना, पुण्यात राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. इतकंच नाही तर हनुमान जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवाकडून हनुमानाची आरती करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता भाजपने थेट शरद पवार यांना आव्हान दिलंय.
'शरद पवार यांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करून, त्यांनी घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करावं. हिंदुंच्या आस्थेवर घाला घालू नका. हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालिसा लावून दाखवा', असं ट्वीट करत भाजपनं थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय. तर दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी हनुमान जयंतीनिमित्त तब्बल एक हजार लाऊडस्पीकर मंदिरांना देण्यता येणार असल्याचं जाहीर केलंय. त्यासाठी त्यांनी अर्जही मागवले आहेत. अर्जांची पडताळणी करुन लाऊडस्पीकर दिले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
