सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा आरोप
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं म्हटलंय. आणखी काय म्हणाले मिटकरी?
सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड नागपुरचा
सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हल्ल्याच्या दिवशी दोन फोन कॉल हे नागपूरहून आले होते, त्यावरून मास्टरमाइंड हा नागपूरचाच असल्याचे स्पष्ट होते असं मिटकरी यांनी म्हटलंय. तर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या दोषी नसते तर ते पळून गेले नसते असं देखील मिटकरी यांनी म्हटलंय.
नागपूरच्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅप कॉल
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद काल सरकारी वकीलांनी केला. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणं झाल्याचं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झालं आहे अशी माहितीही सरकारच्या वतीनं न्यायालयात देण्यात आली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात नागपूरच्या एका व्यक्तीसोबत बोलणं केल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं आहे. 6 तारखेला एक मिटींग झाली होती. त्यात हल्ला करण्याचं ठरवलं गेलं. अभिषेक पाटील नावाचा एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. जो आरोपी देखील आहे. काही पत्रकारांना हल्ल्यावेळी बोलवलं गेलं. युट्यूब चॅनलवरील देखील पत्रकार होते. आरोपींचे सदावर्ते यांच्यासोबतचे काही चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख रुपये जमा
दरम्यान, आरोपींनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये जमा करण्यात आले असून ही रक्कम 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. ही एवढी मोठी रक्कम गेली कुठे, कशासाठी वापरली, ही रक्कम शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनासाठी वापरली आहे का याचा तपास करायचा आहे असं पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
