काॅंग्रेसची किशोरी अवस्था
मागील आठवड्यात काॅंग्रेसचे एक खास चिंतन शिबीर पार पडले म्हणे!!! रणनितीकार प्रशांत किशोर हे मुख्य सेलिब्रिटी होते व त्यांनी ६० वर्षे सत्तेत राहीलेल्या काॅंग्रेसला परत सत्तेत कसे यायचे याचे मार्गदर्शन केले म्हणे ! !!याचा एक सरळ सरळ अर्थ निघतो कि काॅंग्रेसचे अलिकडील हाय कमांड व ६० वर्षे सत्तेत असणारे जुने जाणते अनुभवी नेते पुर्णपणे अपयशी आहेत ? या सात-आठ वर्षात प्रकाश झोतात आलेले प्रशांत किशोर यांचा सल्ला काॅंग्रेसला घ्यावा लागतो यासारखे दुर्दैव नाही, ही काॅंग्रेसची राजकिय व वैचारीक दिवाळखोरीच म्हणावी का ? भले किशोर हे अभ्यासपुर्ण सल्ला देत असतील. किशोर यांनी ३७० जागांवर काॅंग्रेसने लक्ष केंद्रीत करावे व बाकी जागा मित्र पक्षाला द्याव्यात असा माझ्या दृष्टीने अजब सल्ला दिला आहे. यासाठी मित्रपक्ष तयार होतील का याचा विचार केला नाही कारण सात आठ राज्य वगळता इतर सर्व राज्ये हि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात आहेत. आज प्रादेशिक पक्ष हे काॅंग्रेस पेक्षा महत्वाकांक्षी आहेत ते सहजासहजी काॅंग्रेसला पाठिंबा देणार नाहीत. या ऊलट काॅंग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी करावी असाच प्रयत्न करत आहेत .
काॅंग्रेसचे एकला चलो हे धोरण फलद्रूप होणार नाही कारण परवा लागलेला चार राज्यातील निकाल. एकला चलो म्हणजे फक्त राहूल किंवा प्रियांका गांधीच का? युपी , पंजाब , गोवा , छत्तीसगढ या राज्यातील निवडणूक प्रचारात फक्त आणी फक्त राहूल व प्रियांकाच होते . बाकीचे नेते कुठे होते ? ते स्वत:हून प्रचारात आले नाहीत का त्यांना येवू दिले नाही ? मग काॅंग्रेस समाजवाद सोडून सरंजामवादाकडे निघाली आहे का ? श्रीमती सोनिया गांधी यांचा त्याग , संयम , सहनशीलता व भारताप्रती निष्ठा ही अतुलनीय अशीच आहे.
भा ज प ने पद्धतशीरपणे काॅंग्रेस विरोधात जो गैरसमज पसरवला कि काॅंग्रेस ही बहुसंख्य हिंदू विरोधात आहे त्याला छेद द्यायचं काम हे काॅंग्रेसला करावेच लागेल. बहुसंख्य हिंदूचे काही प्रश्न आहेत ते सोडवावेच लागतील जसे वाढती बेरोजगारी , आरक्षणामुळे अन्याय होत असलेली भावना , पात्रता असताना नोकरी किंवा शिक्षणात डावलले जात असल्याची भावना. यातूनच त्यांना मोदी यांचे रूपाने पर्याय दिसला पण इथेपण त्यांची निराशाच झाली.
ज्याेतिरादित्य शिंदे , जगनमोहन रेड्डी यासारखी कुवत असणारे तरूण काॅंग्रेस सोडून का गेले याचे आत्मपरीक्षण करावेच लागेल. सचिन पायलट सारख्या तरूण नेतृत्वावर का मोठी जबाबदारी देत नाहीत? पायलट सुद्धा कुंपणावरच आहेत. ममता बॅनर्जी , जगनमोहन रेड्डी , स्टॅलिन , तेलंगणाचे राव , केजरीवाल हे जर मोदींना समर्थपणे नमोहरम करत असतील तर जनता पर्याय म्हणून त्यांचे मागे का ऊभी राहणार नाही ?
हे काॅंग्रेसच्या बाबतीत का घडत नाही ?भा ज प ला कंटाळून जनता पर्याय नाही म्हणून सत्ता परत काॅंग्रेस ला देईल या भ्रमात जर काॅंग्रेस नेतृत्व असेल तर ती काॅंग्रेस ची राजकीय आत्महत्याच ठरेल. भाजप ला सत्तेवर आणण्यासाठी आर एस एस गेली सत्तर वर्षे राबत आहे. एका विशिष्ट विचारधारेचे तरूण तयार करून त्यांना त्या त्या प्रकारचे शिक्षण देवून येत्या ४०-५० वर्षात सर्वच क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर बसवण्याचे नियोजन केले , याबाबत काॅंग्रेस पुर्णपणे गाफील राहिली .नुसते ऊठ-सुठ आरएसएस ला दोष देवून स्वत:चे अपयश लपवले गेले. किंबहुना आरएसएस पेक्षा बलवान अशी काॅंग्रेस ची काॅंग्रेस सेवा दल नावाची संघटना होती ना ? त्याची आज काय अवस्था आहे? अशी कोणती संघटना होती व आहे हे आजकालच्या तरूणांना माहितसुद्धा नाही.का सेवा दलाला ताकद दिली गेली नाही? व्यक्तीमहात्म्य वाढवण्यात काॅंग्रेसचे जिल्हा , राज्य व देशपातळीवरचे नेते एवढे मशगूल झाले आणी ईथेच काॅंग्रेसचा घात झाला व जनता एका विचित्र व धोकादायक व्यवस्थेत अडकली .भाजप ने एवढे प्रश्न निर्माण केलेत की त्याचा रस्त्यावर येवून सात्तत्याने विरोध करण्याची ताकद आज काॅंग्रेसकडे नाही. फक्त सामान्य जनतेच्या कोसो दूर असलेल्या ट्विटरवर निषेध करणारे ट्विटरनेते ऊदयास आले. जर का भाजप ने समान नागरी कायदा केला तर काँग्रेस ला राजकारण सोडावे लागेल.
हतबल झालेली जनता अजूनही काॅंग्रेसकडे आशाळभूत पणे पहात आहे. प्रादेशिक पक्षांचे महत्व ओळखून काॅंग्रेसने आपली दिशा ठरवावी. सामान्य जनता व बहूसंख्य हिंदु , मुस्लीम , दलीत यांची नाळ जोडणारे प्रादेशिक नेतृत्व तयार करावे लागेल तरच काॅंग्रेस टिकेल. अखंड भारताला सामाजिक , आर्थिक व धार्मिक अराजकतेच्या खाईत लोटू न देण्याची जबाबदारी ही महात्मा गांधींचा वारसा सांगणार्या काॅंग्रेसला घ्यावीच लागेल !
शिवाजी पाटील
सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
