Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय सांगलीत होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ ना. अशोक चव्हाण यांची ग्वाही

सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय सांगलीत होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ ना. अशोक चव्हाण यांची  ग्वाही


सांगली, दि. ११ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय सांगली येथे होण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी दिली असल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, ना. चव्हाण हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेतली आणि सांगलीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय होण्याबाबत चर्चा केली. 

सदरचे मंडळ कार्यालय सांगली येथे व्हावे यासाठी डिसेंबर, 2021 मध्ये पृथ्वीराज पाटील यांनी ना. अशोक चव्हाण यांना निवेदन दिले होते.  त्यावर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी विभागास दिले होते. त्यानुसार मंत्रालयीन स्तरावर हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली असे पाच जिल्हे असून यापैकी सांगली सोडून इतर सर्व जिल्हयासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ अस्तिवात आहे. सांगली हे सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर यांचे अखत्यारित आहे. पर्यायाने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कामासाठी कोल्हापूरला जावे लागत असून त्यामुळे कामांस विलंब होत आहे, तसेच मंत्रालय स्तरावरून मंडळनिहाय निधी वाटपावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर करीता निधी कोल्हापूर व सांगली जिल्हयासाठी विभाजन होऊन सांगली जिल्ह्याकरिता प्रत्येक लेखाशिर्षांतर्गत कमी निधी तसेच कमी कामे मंजूर व प्राप्त होत आहेत.  याकरिता सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ होणे अत्यंत आवश्यक आहे. 

सांगली जिल्ह्यात दहा तालुके असून जिल्ह्याचा विस्तार फार मोठा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकूण 3 व जिल्हा परिषदेचा 1 असे एकूण 4 कार्यकारी अभियंता कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेलाही अजून 1 कार्यकारी अंभियंत्याची आवश्यकता आहे. सध्या सांगली जिल्ह्यात एकूण 948 कि.मी. चे राज्यमार्ग, 2833 कि.मी. प्रमुख जिल्हा मार्ग, 1945 कि.मी चे इतर जिल्हा मार्ग, 6013 कि.मी. चे ग्रामीण मार्ग असे एकूण 11739 कि.मी. चे रस्त्याचे जाळे अस्तित्वात आहे.  सद्यस्थितीमध्ये एकूण 30 ते 35 टक्के इतर जिल्हा मार्ग हे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

या सर्व बाबींचा विचार केला असता सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिक्षक अभियंता असणे फार गरजेचे झाले आहे.  सध्या सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूरचे अधिक्षक अभियंता यांना दोन्ही जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना वेळ देणे व त्यांची कामाची निकड पाहणे अत्यंत अवघड दिसत आहे, तसेच त्यांचे कार्यालय कोल्हापूरमध्ये असल्याने सांगली जिल्ह्यातील कामांना विलंब होत आहे.  

तरी सांगली जिल्हयासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ झाल्यास जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील कामांकरिता कोल्हापूर येथे जावे लागणार नाही. यामुळे वेळ वाचेल व कामांना पुर्वीइतका विलंब लागणार नाही.  तरी सांगलीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय होण्याबाबत आदेशित करावेत, अशी मागणी आपण मंत्रीमहोदयांकडे केली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.  यावेळी सांगलीचे दिलीप पाटील, विजय प्रताप पाटील व विजय शिवाजी पाटील उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.