पोलीस मुख्यालयातील चंदन चोरणारे दोघे पुष्पा अखेर जेरबंद : मिरजेतील दोघांना केली अटक.
विश्रामबाग परिसरात असणाऱ्या पोलीस मुख्यालयाच्या आवारातील ट्राफिक पार्क मधले चंदनाचे झाड तोडून चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पोलिसांनी मिरजेतील दोघांना अटक केली आहे. अभिमन्यू आनंद चंदनवाले (वय ३२ रा. मालगाव रोड, मिरज) आणि रमेश भीमराव चंदनवाले (वय ३६ रा. मंगळवार पेठ मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडूनन ३ किलो १३८ ग्रॅम वजनाचे ४ हजार रुपये किमतीचे चंदनाचे लाकूड जप्त केले आहे.
विश्रामबाग परिसरात पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांचे निवासस्थान आणि त्यालाच लागून ट्राफिक पार्क आहे. या पार्क मध्ये चंदनाच्या झाडांसह इतरही मोठी झाडे आहेत. चोरट्यांनी शुक्रवार दि. १५ जुलै रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान पोलिस ट्रॉफीक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी केली. चोरट्यांनी संबधित झाडे करवतीने कापली आहेत. त्यानंतर फांद्याकडचा भागही कापून तेथेच टाकला आहे आणि केवळ दोन मोठाले बुंधे घेऊन पोबारा केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे दोन बुंधे चोरीला गेल्याची नोंद केली आहे. पोलीस मुख्यालयातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ उडाली होती. याची गंभीर दाखल घेऊन अधीक्षक गेडाम यांनी तपासाचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पथकातील कर्मचारी संदीप पाटील, विक्रम खोत आणि संकेत मगदूम यांना माहिती मिळाली की, दोघेजण वॉन्लेसवाडी येथे पोत्यात चंदन लाकूड घेऊन फिरत असल्याची माहिती मिळली. पथकातील सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, प्रशांत निशानदार यांनी त्याठिकाणी छापा टाकून दोघाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यालयातून चंदनाचे झाड तोडून लाकडांची चोरी केल्याचे सांगितले.
यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदरची कारवाई अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, मेघराज रुपनर, निलेश कदम, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, संकेत मगदूम, विक्रम खोत, आदिनाथ माने, संदीप घस्ते, दरिबा बंडगर यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)