महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं....
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. अनेकजण आमच्या संपर्कात आहेत त्यांची इच्छा आहे आमच्यासोबत येण्याची. ज्यांच्यासोबत आमचं जुळेल त्यांना आमच्यासोबत घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असणार... संख्याबळ वगैरे आम्ही ठरवलेलं नाहीये. संख्याबळ तर आमचेच जास्त असणार आहे त्यात कुणाच्या मनात शंका नाहीये. पण केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. 3 पक्ष आम्ही एकत्रित आहोत. आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील.तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात येईल. एक लक्षात घ्या की, कार्यकर्त्याचं मोटीवेशन काय असतं तर माझा नेता मोठा झाला पाहिजे हे मोटिव्हेशन असतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे असं म्हटलं तर भाजपचे पदाधिकारी आनंदी होतात. तसेच एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांसमोर म्हटलं की, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना मुख्यमंत्री केलं पाहिजे तर ते टाळ्या वाजवतील पण तुलनेत कमी वाजवतील. तो उत्साह नसेल कारण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. आम्ही तिघे एकत्रित याबाबत निर्णय घेऊ आणि यामध्ये मोठा रोल हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महायुतीत मनसे कुठे असेल?
मनसे कुठे असेल हे तर वेळच सांगेल. राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या गाठीभेटी होतात. काही सूचना अनेकदा ते करतात. काहीवेळा टीका सुद्दा करतात. पण सोबत काम करणार की नाही हे लवकरच आपल्याला कळेल. याबाबत आम्ही अद्याप निर्णय केलेला नाहीये असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे तुमच्यासोबत येणार का?
उद्धव ठाकरेंसोबत तुमची जुनै मैत्री आहे. मग ते तुमच्यासोबत येतील का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही. याचं कारण असं की, उद्धवजींनी आमच्यासाठी आपली दारे बंद केली आहेत. राजकारणात सर्वांचा एक पॉलिटिकल अजेंडा असतो. पॉलिटिकल अजेंडा हा वेगळा असला तरी एकत्रित येता येतं. पण आता आमची मन दुखावली आहेत. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे पंतप्रधानांवर टीका करत आहेत, खालच्या पातळीवर बोलत आहेत या सर्व गोष्टींनी मन दुखावली आहेत. जिथे मन दुखावली जातात तिथे युती नाही. जिथे मन दुखावलेली असतात, दुरावलेली असतात तिथे एकत्रित जाणे कठीण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.