Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूच्या नशेत तरुणाला बेल्टने मारलं! कवठेमहांकाळमधील 'त्या' पीएसआयवर निलंबनाची कारवाई!

दारूच्या नशेत तरुणाला बेल्टने मारलं! कवठेमहांकाळमधील 'त्या' पीएसआयवर निलंबनाची कारवाई!


सांगली :  दारुच्या नशेत असताना आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पोलीस उपनिरीक्षकाने बेल्टने जबर मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान या घटनेतील कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील रविराज जमादार नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. 


कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या तरुणाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आणले असतानाच रुग्णालयाच्या बंद खोलीमध्ये नेत मृताच्या भावाला ही मारहाण करण्यात आली होती. तसा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला होता.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय जमादार यांनी दारूच्या नशेत आमच्या मुलाला जबर मारहाण केली असा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला होता. सौरभ संजय वाले (वय 24) असे आत्महत्या केलेल्या तर अस्लेश संजय वाले असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या पोलीस अधिकाऱ्याने अस्लेश याला पैसेदेखील मागितले आहेत, असेही या कुटुंबाने म्हटले होते. या मारहाणीनंतर कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर रात्री उशिरापर्यंत वाले कुटुंबाने आणि नांगोळे गावातील ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता. जोपर्यंत पीएसआयवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

दरम्यान पोलीस उपअधीक्षक सुनील साळूखे यांनी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात जात या घटनेबाबतची माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून सदर पीएसआयवर कारवाई केली जाईल, या आश्वासनांनंतर मयताच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी पार्थिव ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता या पीएसआयवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.