नवी दिल्ली : एकामागून एक घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय, तर दुसरीकडे जयपूरमधून गरोदर महिलेवर तिच्या 3 वर्षांच्या लेकासमोर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलीये. चाललंय काय...आमच्या आया-बहिणींची अब्रू
लुटणाऱ्या या नराधमांना थेट फासावर लटकवा...असा प्रचंड संताप सर्वसामान्य
जनतेतून व्यक्त होतोय. अशात तब्बल 40 वर्षांपूर्वी एका शालेय
विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं आता महत्त्वपूर्ण
निकाल दिला आहे.
सदर घटनेला जवळपास 40 वर्षांहून अधिक काळ उलटलाय. पीडित चिमुकली शाळेत शिकत होती. तिच्या ट्युशनच्या शिक्षकानं तिच्यावर अत्याचार केले. याबाबत पीडितेच्या गुप्तांगावर अत्याचाराच्या कोणत्याही खुणा, जखमा नाहीत, त्यामुळे तिच्यासोबत गैरकृत्य झालंय हा आरोप सिद्ध होत नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या बाजूनं करण्यात आला होता. त्यावर कोर्टानं नराधमाला चांगलंच झापलं. जर इतर सर्व पुराव्यांवरून पीडितेवर अत्याचार झालेत हे स्पष्ट असेल तर तिच्या गुप्तांगावर जखमा नसल्या तरी दोष सिद्ध होऊ शकतो, असे खडेबोल कोर्टानं सुनावले.न्यायाधीश संदीप मेहता आणि न्यायाधीश प्रसन्ना बी वराले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. 'वैद्यकीय अहवालांनुसार, पीडितेला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, असं आढळलं म्हणून इतर पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या गुप्तांगावर जखमा दिसायलाच हव्या असं नाही, परंतु त्यावेळची परिस्थिती, इतर पुरावे विचारात घेतले जातात. कायदा सांगतो की, बलात्काराच्या प्रकरणात आरोप करणाऱ्या व्यक्तीची साक्ष ही जखमी पीडितांएवढीच महत्त्वाची असते. पीडितेच्या केवळ साक्षीवरूनही दोष सिद्ध होऊ शकतो', असं न्यायाधीशांनी सांगितलं.
दरम्यान, पीडितेच्या आईच्या चारित्र्याबाबत आरोपीनं वाईट टिप्पणी करत तिनं आपल्यावर खोटे आरोप लावले, असं सांगितलं होतं. त्यावर कोर्टानं म्हटलं की, 'पीडितेच्या आईच्या चारित्र्याबाबत सतत्या पडताळण्यासाठी कोर्टानं विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही. कारण याचा सदर प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पीडितेवर अत्याचार झालेत हे स्पष्ट आहे, शिवाय या प्रकरणात असं कोणतंही कारण समोर आलेलं नाही की पीडितेच्या आईनं खोटी तक्रार दाखल करावी', असं सांगून कोर्टानं तब्बल 40 वर्षांनंतर या नराधम शिक्षकाला दोषी सिद्ध केलं. दरम्यान, सदर घटना 1984 साली घडली होती. 1986 साली सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टात पोहोचलं. तिथं ते तब्बल 26 वर्षे चाललं. मग प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर निकाल लागायला आणखी 15 वर्षे लागली.
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं होतं?
नराधम ट्युशन घ्यायचा. 19 मार्च 1984 रोजी त्यानं 2 विद्यार्थिनींना काही कामानिमित्त बाहेर पाठवलं, मग दरवाजा लावून पीडितेचं लैंगिक शोषण केलं. दोन्ही मुली बाहेरून दरवाजा जोरजोरात ठोकत होत्या, जेव्हा पीडितेची आजी तिथं आली तेव्हा तिनं आपल्या नातीला हैवानाच्या तावडीतून सोडवलं. जेव्हा पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली तेव्हा आरोपीकडून धमक्या यायला सुरुवात झाली. शेजाऱ्यांनीही त्यांची अडवणूक केली. परंतु त्यानंतर काही दिवसांनी तक्रार दाखल झाली आणि आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी तिचं पूर्ण कुटुंब 40 वर्षांहून अधिक काळ लढलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.