Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Satara : जवान मदन जाधव यांना वीरमरणः कण्हेरखेडमध्ये शोककळा; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara : जवान मदन जाधव यांना वीरमरणः कण्हेरखेडमध्ये शोककळा; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



कोरेगाव : भारतीय नौदलात मुंबई येथे कार्यरत कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील जवान मदन दत्ताजी जाधव (वय ३३) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्यावर काल सायंकाळी कण्हेरखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय नौदलाच्या मुंबई येथील ब्रह्मपुत्रा करंजाव्रण या तळावर रडार प्लॉटर पदावर मदन जाधव हे नेमणुकीस होते. तेथे कर्तव्य बजावताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुलाबा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

 
मदन जाधव यांना वीरमरण आल्याचे समजताच कण्हेरखेड येथे शोककळा पसरली. त्यानंतर गावात त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक जागोजाग लागले. ग्रामस्थांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मदन जाधव यांचे पार्थिव सायंकाळी कण्हेरखेडमध्ये आल्यानंतर वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय आदी घोषणा देत त्यांची सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांसह ३४ जवानांनी त्यांना मानवंदना दिली.

 
या वेळी सातारा जिल्हा पोलिस दलातर्फेही बंदुकीच्या फेऱ्या हवेत उडवून मानवंदना देण्यात आली. या वेळी कोरेगावचे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, रहिमतपूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, मंडलाधिकारी माधवी देशमुख, अॅड. विजयसिंह शिंदे, दुष्यंतराजे शिंदे, अॅड. दीपिका शिंदे, सरपंच सारिका शिंदे, उपसरपंच अजित पवार, समीर शिंदे, संजय शिंदे सरकार, प्रशांत पवार आदी मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. या वेळी कण्हेरखेड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कण्हेरखेड येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मदन जाधव यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत परिश्रमपूर्वक घेऊन ते भारतीय नौदलात रुजू झाले होते. तेथे उत्कृष्ट सेवा बजावता असताना त्यांना पदोन्नती मिळत गेली. सध्या मुंबई येथे कार्यरत होते. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.