चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालांमध्ये गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने चांगले यश मिळवले आहे. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो मात्र, गुजरातच्या विसावदर विधानसभेच्या जागेवर आपचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी १७ हजार ५५४ मतांनी भाजपच्या उमेदवार कीर्ती पटेल यांचा पराभव केला. विशेष म्हणजे तब्बल 18 वर्षांपासून भाजपला ही जागा जिंकता आली नाही.
या जागेवर यापूर्वी आपचाच आमदार होता. मात्र, भाजपने त्याला फोडून आपल्या पक्षात घेतले. त्याने राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत त्याला उमेदवारी न देता भाजपने कीर्ती पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तरीसुद्धा भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये यश मिळवणाऱ्या आपची पंजाबमध्ये देखील जादू चालली आहे. पंजाबच्या लुधियाना पश्चिम जागेवर देखील आपच्या उमेदवार विजयाच्या जवळ आहे. दरम्यान, भाजपने विसावदरमध्ये पराभव स्वीकारला असला तरी गुजरातमधील दुसऱ्या जागेवर विजय मिळवला आहे. कडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजेंद्रकुमार चावडा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राजेंद्र कुमार चावडा यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई चावडा यांचा तब्ब 39 हजार मतांनी पराभव केला आहे. तर, केरळमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीचे उमेदवार आर्यदान शौकत यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी सीपीएमचे उमेदवार एस स्वराज यांचा पराभव केला.
गुजरातमध्ये आपचे चार आमदार
गुजरात विधानसभेच्या 182 विधानसभेच्या जागांवर भाजपचे 161 आमदार आहेत. तर, काँग्रेसचे 12 आणि समाजवादी पक्षाचा एक तर आपचे चार आमदार आहेत. विसावदरमध्ये मिळालेल्या विजयाने आपचा आत्मविश्वास वाढला आहे.
गोपाल इटालिया यांचा राजकीय प्रवास
गोपाल इटालिया हे आपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी सायन्स शाखेतून पदवी घेतली असून ते समाजकार्य करत होते. समाजकार्यातून त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. ते अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू नेते मानले जातात. सोशल मीडियावर त्यांची पकड आहे. तसेच युवकांमध्ये ते प्रसिद्ध आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.