रामती, (पुणे): खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची रुपयांची लाच स्वीकारताना अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) माळेगाव (ता.बारामती) च्या उपप्राचार्याला ‘हॉटेल सिटी इन’ बारामती येथे रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आज मंगळवारी (ता. 24) केली आहे. या कारवाईमुळे अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकच खळबळ उडाली आहे. अवधूत भिमाजी जाधवर (वय-53) असे रंगेहाथ
पकडण्यात आलेल्या उपप्राचार्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त
प्राचार्यांचा कार्यभार देण्यात आला होता. याप्रकरणी एका 33 वर्षीय खाजगी
पॅरामेडिकल संस्थेच्या अध्यक्षाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका खाजगी पॅरामेडिकल संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेतील 45 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. सदर परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आयटीआय) माळेगाव, बारामती येथून परीक्षा पर्यवेक्षक नियुक्त केला जातो. यासाठी तक्रारदाराने संबंधित संस्थेस पत्र दिले होते. त्यावर कार्यवाही करताना आरोपी जाधवर यांनी एका विद्यार्थ्याबाबत 2 हजार रुपयांची मागणी करत 45 विद्यार्थ्यांनुसार एकूण 90 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 10 हजार रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते.पर्यवेक्षक येऊन तक्रारदाराच्या संस्थेतील परीक्षा सुरू झाली. त्यानंतर परीक्षा सुरू असताना अवधूत जाधवर यांनी उर्वरित 80 हजार रुपयांच्या लाच रकमेसाठी तक्रारदाराच्या पाठीमागे तगादा लावला होता. त्यामुळे खाजगी पॅरामेडिकल संस्थेचे अध्यक्ष यांनी सोमवारी (ता. 23) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.दरम्यान, मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, अवधूत जाधवर, उपप्राचार्य (अति. कार्यभार प्राचार्य) यांनी तक्रारदाराकडे पर्यवेक्षक नेमण्याच्या बदल्यात तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान काहीही अडचण न आणण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे सुरवातीस 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. अवधूत जाधवर यांच्या विरोधात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.