ठाणे : पाच वर्षांपुर्वी हत्या झालेले मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुषनुमा शेख यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एक चित्रफित सादर करत राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. या चित्रफितीत जमीलच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचे खुद्द याप्रकरणातील आरोपी ओसामा याने म्हटले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर, मुल्ला हे कारागृहात असते, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या आरोपांबाबत बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची प्रतिक्रिया नजीब मुल्ला यांनी दिली.
राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना, त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तर, गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात मुख्य आरोपी ओसामा याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांनी ओसामा याला उत्तर प्रदेशमधून अटक केली.मंगळवारी जमील शेख यांच्या पत्नी खुषनुमा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खुषनुमा शेख यांनी एक चित्रफित पत्रकार परिषदेत सादर करत मुल्ला यांच्यावर आरोप केले. जमील यांच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचे खुद्द ओसामा याने चित्रफित म्हटले आहे. ही चित्रफित पोलिसांनी लपवून ठेवली होती आणि ती आमच्या हाती लागली आहे, असा दावा खुषनुमा यांनी केला. याप्रकरणात पोलिसांनी आम्हाला कोणतीच मदत केली नाही. पोलिसांनी आम्हाला मदत केली असती तर आज नजीब मुल्ला कारागृहात असते. सरकारला विनंती करते की आम्हाला न्याय द्यावा. नजीब मुल्ला यांना अटक करण्यासाठी ही चित्रफित पुरेशी नाही का असा प्रश्नही त्यांनी विचारला. तत्त्कालीन पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली नजीब मुल्ला यांनीच केली. कारण ते त्यांच्यावर कारवाई करणार होते. आम्ही वकिलांशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरु करू असेही त्या म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.