Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विठ्ठल नेमका कोण? बुद्ध, नेमिनाथ, लोकदेव की कृष्ण? लोकसंस्कृतीतले संदर्भ काय सांगतात?

विठ्ठल नेमका कोण? बुद्ध, नेमिनाथ, लोकदेव की कृष्ण? लोकसंस्कृतीतले संदर्भ काय सांगतात?
 

क वीट आणि त्या वीटेवर कंबरेवर हात ठेवून उभा असलेला मराठीजनांचा सखा-सोबती आणि यार म्हणवला गेलेला, असा तो एक विठ्ठल.

कुणी म्हणतं, हा तर बुद्ध.

तर कुणी म्हणतं, हा गवळी-धनगरांचा लोकदेव. कुणी म्हणतं, हा मुळचा इथला नाहीच, हा तर दक्षिणेतला. तर कुणी म्हणतं, हा जैनांचा नेमिनाथ, तर कुणी म्हणतं, हा या साऱ्यांचाच एक 'महासमन्वय'.

विठ्ठलाची लोभसवाणी पाषाणी मूर्ती तीन फुट, नऊ इंच उंचीची आहे. मात्र, या विठ्ठलावर अनेकांनी अनेक प्रकारचा दावा करुन मालकी हक्क दाखवला आहे. खरं तर, पाषाणातला देव त्याला घडवणाऱ्या माणसांचीच गोष्ट सांगत असतो. त्यामुळे, त्या विठ्ठलाची गोष्ट नक्की आहे तरी काय?

विठ्ठल नेमका आहे तरी कोण? बुद्ध, नेमिनाथ, लोकदेव की कृष्ण?

लोकसंस्कृतीतले संदर्भ काय सांगतात? याचा सविस्तर धांडोळा घेणारी ही 'विठ्ठलशोधाची शब्दवारी'!


विठोबा कुणाचा? विठोबाचा असा शोध कशासाठी?

दुर्गा भागवत, डॉ. जी. ए. दलरी, डॉ. गुंथर सोनथायमर, डॉ. शं. गो. तुळपुळे, डॉ. माणिकराव धनपलवार तसेच डॉ. रा. चिं. ढेरे यांसारख्या अनेक अभ्यासकांनी आजवर विठ्ठलाच्या मूळ रुपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याविषयीच्या अनेक मिथककथा आणि दावे-प्रतिदावे सांस्कृतिक विश्वामध्ये चर्चिले जातात. त्यामुळे, त्याच्या मूळ रुपाविषयीची उत्कंठा आजही तशीच कायम आहे आणि ती अभ्यासकांना भुरळ घालताना दिसते. त्याच्याविषयीच्या अनेक प्रकारच्या मिथककथा लोकसंस्कृतीमध्ये आजही प्रवाहीत आहेत.

या मिथककथांविषयी बीबीसीशी बोलताना डॉ. अशोक राणा म्हणाले की, "या मिथककथांना भाकडकथा ठरवून चालत नाही. त्या आजच्या काळात काय कामाच्या, असा दृष्टीकोनही ठेवून चालत नाही. या मिथककथांमधूनच इतिहासाचे काहीतरी धागेदोरे सापडतात. म्हणूनच, अभ्यासक या मिथककथांचा अभ्यास करतात आणि त्यातून लोकसंस्कृतीचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतात."


विठ्ठलाविषयीच्या अनेक प्रकारच्या मिथककथा लोकसंस्कृतीमध्ये आजही प्रवाहीत आहेत.
संशोधक आणि लोकसंस्कृतीचे प्रख्यात अभ्यासक रा. चिं. ढेरे आपल्या 'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय' या पुस्तकात म्हणतात की, "दैवतांच्या उन्नयनाच्या अथवा स्थिति-गतीचा वेध हा एक प्रकारे त्या दैवतांविषयी श्रद्धा बाळगणाऱ्या समाजाच्याच स्थिति-गतीचा वेध असतो, असे मला आजवरच्या अभ्यासातून जाणवत राहिले आहे."

'विठ्ठल, वीट, पुंडलिक, पंढरपूर, पांडुरंग' ही नावे, त्यासोबतच्या प्रचलित मिथककथा, तसेच, संतसाहित्यात आलेले विठ्ठलाचे वर्णन, काही पुराणे तसेच लोकसंस्कृतीतील गाणी, ओव्या आणि इतर मौखिक साहित्य, लीळाचरित्रासारख्या जुन्या ग्रंथांमध्ये आलेले उल्लेख, ठिकठिकाणच्या मुर्ती आणि शीलालेखांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या मूळ रुपाचा उलगडा करण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी सातत्याने केला आहे.

कोणकोणत्या दिशेने विठ्ठलशोधाचा प्रयत्न झालाय, ते पाहूयात.

विठ्ठलाच्या मिथककथा आणि त्याबद्दलचे दावे-प्रतिदावे

विठ्ठलाचा शोध घेण्याची सुरुवात करताना, सर्वांत आधी विठ्ठलाविषयीच्या सर्वांत प्रचलित मिथककथेपासूनच सुरुवात करु.

'माता-पित्याच्या सेवेत मग्न असलेला पुंडलिक आणि त्याने फेकलेल्या वीटेवर गेली अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या विठ्ठलाची' मिथककथा सर्वांधिक प्रचलित आहे.

या मिथककथेबद्दल आम्ही प्रा. अशोक राणा यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, "पुंडलिकाची ही कथा पहिल्यांदा 'स्कंदपुराणा'अंतर्गत रचल्या गेलेल्या पांडुरंग महात्म्यामध्ये आली आहे. त्याचा रचनाकाल चौदावे ते पंधरावे शतकादरम्यान मानला जात असावा, असं लोकसंस्कृतीचे अभ्यासक रा. चिं. ढेरे म्हणतात.'"

प्रख्यात अभ्यासक रा. चिं. ढेरे यांचं 'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय' हे पुस्तक
पुंडलिकाच्या या कथेविषयीचं विश्लेषण करताना रा. चिं. ढेरे म्हणतात की, "ज्ञानदेवांच्या काळापूर्वीच जनमानसाने स्वीकारलेली पुंडलिकाची कथा ही ऐतिहासिक नसून, ती विठ्ठलाची शुद्ध पौराणिक प्रकृतीची अवतरणकथा आहे. पुंडलिक हा इतिहासाचा पुत्र नाही, तर भक्तांच्या भावभूमिकेतला केवळ कल्पवेल आहे. पंढरी, पंढरपूर या नावांनी आज गाजत असलेल्या विठ्ठलक्षेत्राचे मूळ कन्नड नाव 'पंडरगे' असं आहे."

पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश 'पंडरगे' असा केलेला आढळतो.

पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे. या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. पुढे, 'पांडुरंग' हे विठ्ठलाचं नाव नसून ते त्या क्षेत्राचं नाव आहे, असंही ते विश्लेषण करतात.

'काशी विश्वनाथ' म्हणजे काशीचा विश्वनाथ, 'तिरुमलै वेंकटेश' म्हणजे तिरुमलैचा वेंकटेश अगदी तसेच पांडुरंग विठ्ठल म्हणजे 'पांडुरंग या क्षेत्रातील विठ्ठल हा देव' होय, अशी मांडणी ते करतात.

"विठ्ठल या नावाचा अर्थ समाधानकारकरीत्या उलगडलेला नाही. त्यामुळेच, त्या नावाच्या स्पष्टीकरणासाठीच 'पुंडरिका'ने वीट भिरकावल्याची कथा रचली गेली आहे", असं ते सांगतात. पुढे, पांडुरंग हेच क्षेत्रवाचक नाव देवाचे म्हणजेच विठ्ठलाचे एक लोकप्रिय नाव बनल्याचंही ते सांगतात.

'विठ्ठल' नावामागचं न सुटलेलं कोडं

विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती आजवर मिळालेली नाहीये. मात्र, त्या नावामागची गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.

इतिहास संशोधक अनंत रामचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या 'विठोबा' या लेखात याबाबत माहिती दिली आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द 'विष्ठल' (दूर रानावनात असलेली जागा) या शब्दापासून आला असावा, असं म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यानुसार, विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते 'विष्णु' ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप 'विट्टि' असं होतं. 'विट्टि'वरूनच 'विठ्ठल' हे रूप तयार झालं असावं, असं ते म्हणतात.

विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती आजवर मिळालेली नाहीये. मात्र, त्या नावामागची गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.
शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील 32 व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी विष्णुचे 'विट्टु' असं रूप कसं होतं, हे दाखवलं आहे. ह्या रूपालाच प्रेमाने 'ल' हा प्रत्यय लावला, की 'विठ्ठल' असं रूप तयार होते, असं प्रतिपादन ते करतात.

विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह्‌ णाति) म्हणजे 'अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील 'विठ्ठल' ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्विक अर्थ प्राप्त करून देण्यात आलेला आहे. 'विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)' 'म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल', अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे.

इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणं आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेलं, असं आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी 'इटु' असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ 'कमरेवर हात ठेवलेला'असा असल्याचं प्रतिपादन केलं आहे. 'विटेवर जो उभा, तो विठ्ठल'अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.

श्रीवेंकटेश आणि श्रीविठ्ठल, कधीकाळचा 'दक्षिणेतला' एकच देव?

विठ्ठल हा महाराष्ट्रातील मूळच्या लोकांचा देव नसावा, असाही कयास अभ्यासकांचा आहे. "असा विठोबा, आपले आराध्यदैवत असूनही कुणाचेही कुलदैवत नाही," असं इरावती कर्वे यांनी 'महाराष्ट्र: एक अभ्यास' या त्यांच्या संशोधनपर ग्रंथात म्हटलं आहे. 'वर्षानुवर्षे त्याची पूजा करण्याचा मान ज्या बडवे, डिंगरे, दिवटे, पुजारी, बेणारे यांच्याकडे होता, त्यांचंही ते कुलदैवत नाही. तेव्हा तो ज्याअर्थी कुलदैवत नाही, त्या अर्थी इथल्या मूळच्या लोकांचा तो देव नसावा', अशी शंका त्यांनी आपल्या 1971 सालच्या या पुस्तकात व्यक्त केली आहे.

पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत. त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. त्याशिवाय, आणखीही लहान-सहान बाबींमधून त्याचे 'कानडेपण' सिद्ध होते. त्यामुळे, त्याची दक्षिणेशी अधिक जवळीकता उठून दिसते, अशी अभ्यासकांची मांडणी आहे.

यासंदर्भात डॉ. अशोक राणा आपल्या 'दैवतांची सत्यकथा' पुस्तकात म्हणतात की, "उत्तर कर्नाटकातील बदामीच्या द्वितीय पुलकेशीच्या धाकट्या भावाचे जन्मनाव बिट्ट किंवा बिट्टरस असे होते. याच नावाचे राजे होयसळ वंशातही झाले आहेत. विठ्ठल नावाचेही राजे दक्षिणेत झाले आहेत. कानडी भाषेत विष्णू या शब्दाचे रूप बिट्टी असे तयार होते, हे डॉ. रा. गो. भांडारकर यांनी दाखवून दिलं आहे. बिट्टीवरूनच विठ्ठल हा शब्द बनला, असे 'शब्दमणीदर्पणा'च्या अपभ्रंश प्रकरणातील 32व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी दाखवले आहे. तेव्हा 'विठ्ठल कानडी आहे,' हे मान्य करायला हरकत नसावी." याच पार्श्वभूमीवर, विठ्ठलाचे दक्षिणेतील सुप्रसिद्ध देव असलेल्या वेंकटेशाशी अनेक बाबतीत साधर्म्य असल्याने हे दोन्हीही देव कधीकाळी एकच देव असल्याची शक्यताही बोलून दाखवली जाते.

असा विठोबा, आपले आराध्यदैवत असूनही कुणाचेही कुलदैवत नाही," असं इरावती कर्वे यांनी 'महाराष्ट्र: एक अभ्यास' या त्यांच्या संशोधनपर ग्रंथात म्हटलं आहे. विठ्ठल आणि श्रीवेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रुपांशी संबंध नसणारे तरीही विष्णुरुप पावलेले आहेत. विठ्ठल 'बाळकृष्ण' मानला जातो, तर वेंकटेश 'बालाजी' या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली, तर वेंकटेशाची पत्नीदेखील चिडून दूर वेगळी राहिलेली आहे. दोघेही शस्त्रहीन आणि मौनी आहेत.

त्यामुळे, या दोघांमधील साधर्म्य अधोरेखित करुन रा. चिं ढेरे यांनी म्हटलंय की, "या साम्याचा आपण जो जो वेध घेत राहू, तो तो आपण अशा निष्कर्षाप्रत येऊ की, हे दोन देव आज वेगळ्या नामांनी, रुपांनी आणि चरित्रांनी दोन वेगळ्या स्थानी नांदत असले, तरी ते मूलत: एकाच लोकदेवाचे, भिन्नस्थानीय विकासक्रमांत भिन्न बनत गेलेले उन्न्त अविष्कार आहेत." राधेच्या (म्हणजेच विठ्ठलरुपात राही) मत्सरापोटी रुसलेल्या रुक्मिणीच्या शोधासाठीच विठ्ठल दिंडीरवनात (म्हणजेच आजच्या पंढरपुरात) आला, अशीही एक मिथककथा प्रसिद्ध आहे. ती या पार्श्वभूमीवर लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.

विठोबा हा गवळी-धनगर-यादवांचा लोकदेव?

विठोबा नक्की कोण आणि अभ्यासकांकडून त्याच्या मुळाचा शोध घेण्याचे प्रयत्न का झाले, हा प्रश्न सर्वांत आधी महत्त्वाचा ठरतो. विठ्ठलाचं मूळ एका गोरक्षक वीराच्या स्मारकात असले पाहिजे, असे मत डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी महानुभवांच्या 'लीळाचरित्रा'तील एका लीळेच्या आधाराने 1977 साली 'मराठी संशोधन-पत्रिका'मध्ये मांडलं होतं.

त्यानंतर विठ्ठलशोधाची अभ्यासकांची मोहिम अधिक गतीशील झाली. याविषयी बोलताना अभ्यासक डॉ. अशोक राणा म्हणाले की, "विठोबाच्या मूळ रुपाचा शोध घेण्याचा प्रारंभ लीळा-चरित्रापासून झाला. लीळाचरित्रामध्ये 'विठ्ठलवीरु-कथन' नावाची एक लीळा आहे. त्या लीळेमध्ये एक विठ्ठल नावाचा वीर होता आणि गुरांचं रक्षण करताना त्याला वीरमरण आलं. त्याचं स्मारक म्हणून एक वीरगळ उभं करण्यात आलं. लीळाचरित्रात त्यासाठी 'भडखंबा' असा शब्द वापरण्यात आला आहे. हे सूत्र सगळ्या अभ्यासकांनी समोर ठेवूनच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो मूळचा 'गुराख्यांचा लोकदेव' आहे, हे आता बहुतांश अभ्यासकांनी मान्य केलंय." थोडक्यात, तो दक्षिणेतील गोपजनांचा लोकदेव असून क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आजच्या या स्वरुपापर्यंत पोहोचला असावा. विठ्ठल हा गवळी-धनगरांपैकी कुणीतरी गोरक्षणासाठी मृत्यू पावलेला वीर होता व त्याला पुढे विष्णूरूप प्राप्त झालं, असा हा दावा आहे.

1956 साली पहिल्यांदा डॉ. दुर्गा भागवत यांनी आपल्या 'लोकसाहित्याची रूपरेषा' या ग्रंथात विठ्ठल हा गोपजनांचा म्हणजे गवळ्यांचा देव आहे, असं मत मांडलं होतं. त्यानंतर त्याच दिशेने डॉ. जी. ए. दलरी, डॉ. गुंथर सोनथायमर, डॉ. शं, गो. तुळपुळे, डॉ. माणिकराव धनपलवार तसेच डॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधनकार्य केलं.

डॉ. गुंथर सोनथायमर यांना पंढरपूरमध्ये महाद्वारासमोर एका वीराची स्मारकशीला दिसून आली. त्यांनी डॉ. तुळपुळे यांच्या ती नजरेस आणून दिली. त्यानंतर डॉ. तुळपुळे ह्यांनी त्या वीरगळात विठ्ठलाचे मूळरूप असले पाहिजे, असं मत मांडलं आणि डॉ. दलरी यांनी यांच्या त्या मताला पुष्टी दिली. विठ्ठल आणि वीरगळ यांच्या संबंधांची स्पष्ट मांडणी सर्वांत आधी डॉ. जी. ए. दलरी यांनी केली.

मात्र, दुसऱ्या बाजूला वीरगळ हे विठ्ठलाचं मूलरूप असां, हे मत डॉ. ढेरे ह्यांना मान्य नाही. लीळाचरित्रातील ती कथादेखील प्रक्षिप्त असावी, असं त्यांचं मत आहे. डॉ. रा. चिं ढेरे ह्यांच्या मते विठोबा हा मूलतः गोपजनांचा देव आहे. रा. चिं. ढेरे हे अलीकडे होऊन गेलेले महत्त्वाचे असे संशोधक आहेत, ज्यांनी या सगळ्या संशोधकांच्या संशोधनाला एकत्र करत आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

ते म्हणतात की, आंध्र-कर्नाटकातले गोल्ल-कुरुब आणि महाराष्ट्रातले, विशेषत: दक्षिण महाराष्ट्रातले गवळी-धनगर हे विठ्ठलाचे मूळ उपासक असून त्यांना आंध्र-कर्नाटकात आजही 'यादव' म्हणून ओळखलं जातं. अशा गोपजनांचा हे मूळचा लोकदेव असल्याचंही म्हटलं जातं. या गोपजनांना जसं यादव म्हणून संबोधलं जातं, अगदी तसंच विठ्ठलोपसानेचं वैभव ज्यांनी वाढवलं आहे, ती राजवटही 'यादव' याच नावानं ओळखली जाते. त्यांनीच त्याला विष्णु-कृष्ण-रुप प्राप्त करुन दिलं, असंही ढेरे सांगतात.

या सगळ्याविषयी मांडणी करताना ते म्हणतात की, "विठ्ठल-बीरप्पा या कुरुब-धनगरांच्या जोडदेवातला विठ्ठल हा विजयनगरच्या स्थापनेपूर्वी जवळजवळ शे-दीडशे वर्षांपासून कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर, पंढरपूर येथे विष्णु-कृष्ण रुपात लोकप्रेमाच्या नि राजप्रेमाच्या आबीर-गुलालात रंगून गेलेला होता आणि बीरप्पा हा आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्रात वीरशैवांच्या प्रभुत्वाखाली अनेक ठाण्यांत वीरभद्ररुप पावला होता." थोडक्यात, 'यादवांचा देव' असलेला विठ्ठल आजही एका बाजूला आपल्या गोपजनीय मूळ रुपात महाराष्ट्रात नांदत असून धनगरांच्या विरोबाशीही नातं सांगतो, तर दुसऱ्या बाजूला तो वैदिकीकरणानंतर विष्णुरुपात कृष्णाचा अवतार म्हणूनही भक्तांसाठी उभा ठाकलेला दिसतो.

'यादवांचा देव' असलेला विठ्ठल आजही एका बाजूला आपल्या गोपजनीय मूळ रुपात महाराष्ट्रात नांदत असून धनगरांच्या विरोबाशीही नातं सांगतो, तर दुसऱ्या बाजूला तो वैदिकीकरणानंतर विष्णुरुपात कृष्णाचा अवतार म्हणूनही भक्तांसाठी उभा ठाकलेला दिसतो, असं रा. चिं. ढेरे म्हणतात.
मूळ लोकदेव असलेल्या या विठोबाची कीर्ती उत्तरोत्तर इतकी वाढत गेली की, त्यानंतर त्याचं वैदिकीकरण करण्यात आलं आणि त्याला आताचं 'कृष्णाचा अवतार' हे स्वरुप प्राप्त झालं, अशी मांडणी अभ्यासक करतात.

याबाबत रा. चिं. ढेरे लिहितात, "विठ्ठलाचे केवळ वैष्णवीकरणच नव्हे, तर त्याचे वैदिकीकरणही संतांच्या उदया-पूर्वीच घडले होते आणि ते अगदी आजपर्यंत घडत राहिले आहे. हे वैष्णवीकरण आणि वैदिकीकरण घडविण्यात यादव राजकुळांच्या उत्तेजनाने क्षेत्रोपाध्यायांनी जसा पुढाकार घेतला, तसाच शास्त्री पंडितांनीही पुढाकार घेतला. या लोकप्रिय देवामागे श्रुति-स्मृतींची आणि इतिहास-पुराणांची परंपरा उभी केल्यावाचून क्षेत्रोपाध्यायांना आणि शास्त्री-पंडितांना त्याचा स्वीकार करणे सोयीचे नव्हते."

याशिवाय, पंढरीचा विठ्ठल हा 'जैनांचा देव' आहे, असा दावा बहुधा अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत उच्चारला जात असावा, असं मानायला जागा आहे. त्याला 'नेमिनाथ' ठरवलं गेलं होतं, असंही रा. चिं. ढेरे सांगतात. शिवाय, यातील काही अभ्यासकांच्या मते, विठोबा हा देव ज्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसित होत गेला आहे, त्याच्या त्या त्या वेळच्या सांस्कृतिक छटा आजही कमी-अधिक फरकाने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्वरुपात पहायला मिळतात.

रा. चिं. ढेरे हे अलीकडे होऊन गेलेले महत्त्वाचे असे संशोधक आहेत, ज्यांनी या सगळ्या संशोधकांच्या संशोधनाला एकत्र करत आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, अहोबलम् (आंध्र प्रदेश) येथे असलेली विठ्ठलमूर्ती कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभी आहे. हिच्या हातांत आणि कमलनाल आहेत. मस्ताकावर उंच, टोपीवजा नक्षीदार मुकुट आहे. ही मूर्ती पंढरपूर येथे असलेल्या विठ्ठलमूर्तीपेक्षा खूपच जुनी असल्याचे ग. ह. खरे यांचे मत आहे.

कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्‌ळीमध्ये, तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी इथे चेन्न केशवाच्या मंदिरात, वसरूल (जि. मंड्या) येथील मल्लिकार्जुनमंदिरात आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे विठ्ठलमूर्ती आहेत. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपीमध्येही विरुपाक्षमंदिरात विठ्ठलमुर्ती आहे. अगदी कोल्हापुरातील पट्टणकोडोलीमध्येही 'विठ्ठल-बिरदेव' या जोडदेवतेचं मंदिर आहे.

याशिवाय, कृष्णरुप मानला गेलेला, कटीवर हात ठेवून उभा असलेला पश्चिम बिहारमधील अहिरांचा देव 'बीर कुअर' (वीर कुमार) असो, वा अहिल्यानगरमधील (पूर्वीचे अहमदनगर) टाकळीभान येतील रुक्मिणीसहित असलेला चार हातांचा आणि मिशांचा विठ्ठल असो… अशा वेगवेगळ्या रुपातील विठ्ठलाच्या छटा त्याच्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढवताना दिसतात.

विठ्ठल हा बुद्ध?

'विठ्ठल हा जैनांचा नेमिनाथ आहे', हा दावा आता विरळ झालेला असला तरीही विठ्ठल हा बुद्धच असल्याचा दावा आजही अधूनमधून केला जातो. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच तो करुन ठेवला असल्याने या दाव्याला सांस्कृतिक चर्चाविश्वात अधिक वजन प्राप्त झालं आहे. स्वत: आंबेडकरांनी या विषयावर एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. पण तो ग्रंथ पूर्णत्वास गेला नाही.


धनंजय कीर लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकात त्यांचं मत संक्षिप्त स्वरुपात देण्यात आलंय. "पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती मुळात बुद्धाची मूर्ती आहे. यावर मी एक प्रबंध लिहित व तो पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून निर्माण झाला आहे. 'पुंडरीक' म्हणजे कमळ व पाली भाषेत कमळाला पांडुरंग असे म्हणतात. यावरुन स्पष्ट होते की, पांडुरंग म्हणजेच बुद्ध आहे, दुसरा कुणीही नाही."

वारकरी संतांनीही विठ्ठलाकडे 'बुद्ध' म्हणून पाहिल्याचे अनेक संदर्भ त्यांच्या अभंगांमधून आणि रचनांमधून स्पष्ट होते.

'विठ्ठल हा बुद्धच,' असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करुन ठेवला असल्याने या दाव्याला सांस्कृतिक चर्चाविश्वात अधिक वजन प्राप्त झालं आहे.
जनाबाई म्हणते,

होऊनिया कृष्ण कंस वधियेला |

आतां बुद्ध झाला सखा माझा || (344)

एकनाथ म्हणतात,

नववा बैसे स्थिररुप | तया नाम बौद्धरुप ||

संत तया द्वारी | तिष्ठताति निरंती ||

पुंडलिकासाठी उभा | धन्य धन्य विठ्ठलशोभा ||

पुढे आणखी एका रचनेत ते म्हणतात,

बौद्ध अवतार घेऊन | विटे समचरण ठेवून |

पुंडलीक दिवटा पाहून | तयाचे द्वारीं गोंधळ मांडिला ||

बया दार लाव || बौद्धाई बया दार लाव || (3911)

तुकोबा म्हणतात,

बौद्ध अवतार माझिया अदृष्टा | मौन्य मुखे निष्ठा धरियेली ||

संत नामदेव म्हणतात,

गोकुळी अवतारु सोळा सहस्त्रां वरु |

आपण योगेश्वरु बौद्धरुपी ||

थोडक्यात, वारकरी पंरपरेतील वेगवेगळ्या काळातील संतांनी विठ्ठलाला 'मौनस्थ' आणि 'बौद्ध' या विशेषणांनी वारंवार उल्लेखलेलं आहे.

या साऱ्याविषयी उहापोह करताना रा. चिं. ढेरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की, "मराठी संतांनी वैदिक परंपरेशी आत्मीयतेचे नाते राखलेले असूनही त्यांनी अवैदिक बुद्धाशी विठ्ठलाचे नाते का जोडले? विठ्ठल आणि बुद्ध यांना एकरुप मानण्याइतके असे कोणते समधर्मित्व त्यांच्या ठायी होते? बुद्धाचे पौराणिक अवतारविशेष माहीत असूनही संतांनी आपले परमाराध्य बुद्धरुपात का अनुभवले? विठ्ठलाचे बुद्धाशी नाते जोडताना त्याच्या धर्माच्या ऱ्हासकालीन रुपाविषयी संतांनी कोणती भूमिका स्वीकारली?"

पुढे या सगळ्याचंच विश्लेषण करत ते म्हणतात की, "आपल्या परंपरेत सहसा काही नष्ट होत नाही, केवळ भिन्न नाम-रुपाने परिवर्तन पावते, हे आपण विसरता कामा नये."

"बौद्ध धर्माचा हा नवा भागवती अवतार म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातले वैचारिक पातळीवरचे एक महान युगांतर आहे," असंही ते म्हणतात.
विश्‍वकर्मा प्रकाशन"आठव्या शतकात जे बहुतेक लोक बौद्ध झाले त्यांनी विठ्ठलाची बुद्ध म्हणूनच पूजा केली. मात्र, बुद्धाच्या मुर्तीचं वैशिष्ट्य विठ्ठलाच्या मुर्तीत दिसत नाही," असा दावा डॉ. अशोक राणा करतात. 'दैवतांची सत्यकथा' हे त्यांचं पुस्तक.
विठोबा हा जर मूळचा गोपजनांचा लोकदेव असेल, असा दावा बहुतांश अभ्यासक करत असतील तर मग तो बुद्ध असल्याचा दाव्यांमध्ये कितपत तथ्य असू शकतं?

तसेच, संतांनीही त्याचं वर्णन 'बौद्धरुप' स्वरुपात कसं काय केलेलं आहे, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

यासंदर्भात बीबीसीशी बोलताना डॉ. अशोक राणा म्हणाले की, "तेराव्या शतकाच्या आधी तसेच संतशिरोमणी नामदेवांनी विठ्ठलाला 'कृष्णाच्या बाळरुपात' पुढे आणण्याआधीचा बराच मोठा काळ बौद्धांनी त्याला बुद्ध म्हणून आळवलेलं आहे, असं यातून दिसून येतं. महाराष्ट्रात साधारणत: एक हजार लेण्या आहेत. त्यातल्या आठशे बौद्ध लेण्या आहेत. दोनशे लेण्या जैन, शैव वा इतर पंथांच्या आहेत. मात्र, त्यातल्या सगळ्यात जास्त बौद्ध लेण्या आहेत. आठव्या शतकात मध्य भारतात 'वज्रयान पंथ' भरभराटीस होता. याच काळात बऱ्याचशा दैवतांचं बौद्ध रुपांतरण झालं आहे. तेव्हा जे बहुतेक लोक बौद्ध झाले त्यांनी विठ्ठलाची बुद्ध म्हणूनच पूजा केली. मात्र, बुद्धाच्या मुर्तीचं वैशिष्ट्य विठ्ठलाच्या मुर्तीत दिसत नाही."

पुढे ते म्हणतात की, "याच आठव्या शतकाच्या आधी आणि आसपास जैनांनीही त्याला कृष्णाचं 'नेमिनाथ' हे तीर्थंकर रुप देण्याचा प्रयत्न केला होता. नेमिनाथ हा कृष्णाचा भाऊ म्हणूनही काही ठिकाणी उल्लेख आहेत. त्यामुळे, जैनांनीही विठ्ठल मंदिराला बऱ्याच देणग्या दिल्याचेही उल्लेख सापडतात. त्यामुळे, मधला बराच काळ विठोबाची पूजा ही नेमिनाथ म्हणूनही झालेली आहे. थोडक्यात, त्याची पूजा नेमिनाथ म्हणून झालेली आहे, बुद्ध म्हणून झालेली आहे आणि नंतरच्या काळात त्याला 'कृष्णाचा अवतार' म्हणून स्वीकारलं गेलंय. त्यानंतरच्या काळात, वैदिकीकरणानंतर वारकरी संतांनी त्याला कृष्णाचं बाळरुप म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळेच, विठोबाचं बौद्धरुप असणं हे संतांच्या नेणिवेत असल्याचं त्यांच्या अभंगातील वर्णनातून दिसून येतं, ते यामुळेच…"

विठोबा - साऱ्यांचा महासमन्वय?

गेली आठ शतके वा त्याहून अधिक काळ हा काळाकुट्ट तरीही लोभसवाणा आणि निशस्त्र असा देव भक्तांच्या गराड्यात आकंठ बुडालेला आहे. तोच तो पांडुरंग, हरी, विठोबा, विठू, विठ्या, इठू तर तुकोबांच्या अभंगातील उल्लेखाप्रमाणं हे 'पंढरीत असलेलं एक मोठं भूत'...

तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे हे असं एक भूत आहे, जे आल्या-गेलेल्यांना अशी झडप घालतं की ती व्यक्ती त्याचीच होऊन जाते. अगदी अभ्यासकांनाही त्याची भुरळ पडली नसती तर नवलच. त्यामुळेच, या विठोबाचं मूळ नक्की आहे तरी काय, याचा शोध घेणं आजही अव्याहतपणे सुरु आहे.

गेली आठ शतके वा त्याहून अधिक काळ हा काळाकुट्ट तरीही लोभसवाणा आणि निशस्त्र असा देव भक्तांच्या गराड्यात आकंठ बुडालेला आहे.
विठ्ठलाच्या मूळ रुपाविषयीच्या इतक्या साऱ्या शक्याशक्यता धुंडाळल्या तरीही 'विठोबा नक्की आहे तरी कोण', या प्रश्नाचा शोध अद्यापही थांबलेला नाहीये.

अभ्यासकांना अद्यापही 'विठ्ठल' या नावाची व्युत्पत्ती समाधानकारकरीत्या देता आलेली नाहीये.

आजवर त्याची पाळेमुळे खणण्याचा भरपूर प्रयत्न झाला असला तरीही त्याच्या शोधासाठी अद्याप भरपूर वाव आहे.

सध्या हा लोकप्रिय देव, बुद्ध, जैन, शैव, वैष्णव अशा सगळ्यांचा महासमन्वय साधणारा दुवा बनला आहे, असं रा. चिं. ढेरे म्हणतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.