Bajau Tribe : पाण्यात राहणारे जलमानव
पृथ्वीवर अशा अनेक चमत्कारीक गोष्टी आहेत, ज्या मानवाच्या विचार करण्याच्या क्षमते पलिकडील आहेत. यातील काही गोष्टींचा मानवाने अभ्यास केला आहे तर काहींबाबतीत मानव अद्यापही अनभिज्ज्ञ आहे. या अभ्यासात मानवाने पृथ्वीवरील डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि आपल्या आजूबाजूच्या सजीव जगाबद्दल बरंचसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्यापलीकडेही आश्चर्यांनी भरलेले एक विशाल जग या पृथ्वीवर आहे. अशीच एक आश्चर्य करणारी गोष्ट आपल्या पृथ्वीतलावर आहे, ती म्हणजे पृथ्वीवर अशी एक मानवी जमात आहे, जी पाण्यात राहते. ही जमात 'बाजाऊ जमात' या नावाने ओळखली जाते.
'समुद्री भटके' अशी ओळख
पाण्यात राहणारी बाजाऊ जमात इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलीपिन्सच्या सागरी प्रदेशात राहते. त्यांना 'सी जिप्सीज' आणि 'सी नोमॅड्स' म्हणजेच 'समुद्री भटके' म्हणून ओळखले जाते. या जमातींसाठी समुद्र हेच उपजीविकेचे आणि राहण्याचे साधन आहे.
समुद्रात घरे बांधतात-
ही जमात जमिनीवर स्थायिक होत नाही, उलट ते समुद्रात घरे बांधतात किंवा बोटींचे घरात रुपांतरित करतात. जेव्हा त्यांना पकडलेले मासे विकण्यासाठी इतर गोष्टींची आवश्यकता असते, तेव्हाच ही जमात जमिनीवर येते. कारणाशिवाय ही जमात जमिनीवर जाणे टाळते. समुद्र हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असले तरी, ते एकाच ठिकाणी राहत नाहीत. कारण ते मासे पकडण्यासाठी फिरतात. जमातीची उत्पत्ती कशी झाली?
असे सांगितले जाते की, बाजाऊ जमातीची उत्पत्ती दक्षिण फिलीफिन्सच्या सुलू बेटावरून झाली आहे. त्यांच्या भटक्या सागरी जीवनशैलीमुळे ही जमात हळूहळू मलेशिया, ब्रुनेई आणि इंडोनेशियाच्या पाण्यात स्थलांतरीत झाली. आधी पूर्व इंडोनेशियातील मालुकू, राजा अम्पाट, सुलावेसी आणि कालीमंतनच्या उत्तरेकडील भागात राहत होती, असे सांगितले जाते.
श्वास रोखून करतात डायव्हिंग -
विलक्षण पोहण्याच्या कौशल्यासाठी ही जमात ओळखली जाते. हे लोक खोल समुद्रात श्वास रोखून डायव्हिंग करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही साधनाशिवाय. या जमातीतील लोक एकावेळी 5 ते 13 मिनिटे श्वास रोखू शकतात.
आनुवंशिक भिन्नतेमुळे शक्य -
एका वैद्यकिय अभ्यासानुसार, या लोकांच्या प्लीहा या सामान्य लोकांपेक्षा थोड्या मोठ्या असतात, ज्यामुळे त्यांना पोहताना पाण्याखाली जास्त काळ श्वास रोखून ठेवण्यास मदत होते. आनुवंशिक भिन्नतेमुळे हे शक्य होते, असे सांगितले जाते.
ऑक्टोपसची करतात शिकार -
बाजाऊ जमात इतकी धाडसी आहे की, ते समुद्रात 30 मीटर खोलवर मासे आणि ऑक्टोपससारख्या समुद्री जीवांची शिकार करण्यासाठी भाले वापरतात.
कोणत्याच देशाचे नागरिकत्व नाही -
समुद्रात जन्मलेले, वाढलेली ही बाजाऊ जमात शिक्षणाकडे फारस लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी बहुतेक लोक हे निरक्षर आहेत. एका अहवालात तर यांच्याविषयी असे सांगण्यात आले आहे की, त्यांना त्यांचे वयही माहीत नाही. शिवाय, याहूनही दुःखद गोष्ट अशी आहे की, कोणत्याही देशाने या जमातींना नागरिक म्हणून ओळख दिली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.