हिंदीऐवजी दुसरी भाषा शिकायची असल्यास २० पेक्षा जास्त विद्यार्थी इच्छुक असण्याची अट घालण्यात आल्याने, जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हिंदी सक्तीला जाहीर विरोध दर्शवला आहे. हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर आपली स्पष्ट मतं मांडली आहेत.
केदार शिंदे पोस्ट शेअर करत म्हणतात, “ठेच लागल्यावर "आई गं!" म्हणायचं की, "ओ मेरी माँ…" यात पहिली ते चौथीच्या बाळांना कॉन्फयुज्ड करू नका…त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या! हिंदी सक्ती नकोच…जय महाराष्ट्र.” त्यांच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आधीपासूनच आक्रमक भूमिकेत आहे. राज ठाकरे यांनी २६ जून रोजी पत्रकार परिषद घेत, हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रात भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, येत्या काळात यावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.