सांगली :- 'आम्ही येथील दादा आहे, उद्या हद्दपार सुनावणीच्या केसमध्ये तारीख आहे. तू तक्रार मागे घे', अशी दमदाटी करीत सराईत गुन्हेगारासह दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना संजयनगर परिसरातील जगदाळे प्लॉट व उर्मिलानगर येथे घडली. आफ्रिद सिकंदर आनंदपुरे (वय 20, रा. आलिशान कॉलनी, कुपवाड) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल आहे.
अमन ख्वाजा मोकाशी, फातिमा ख्वाजा मोकाशी (दोघे रा. उर्मिलानगर, बावडेकर कॉम्प्लेक्समागे, सांगली), शाहिद इरफान खान (रा. मंगळवार बाजार, नेहरूनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. यातील संशयित अमन मोकाशी याच्याविरोधात पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. फिर्यादी आफ्रिद हा जगदाळे प्लॉट येथील रामजानकी मंदिराच्यामागे रस्त्यावरून जात असताना संशयित अमन व शाहिद हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. दोघांनी आफ्रिदला अडवून 'तू व इकलास मुलाणी या दोघांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली?, आमची इथे दहशत आहे.हद्दपारीच्या सुनावणीवेळी तक्रार मागे घ्यायची', असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने आफ्रिदच्या डाव्या हाताच्या कोपर्यावर दोन वार केले. शाहिद यानेही शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर आफ्रिदला दोघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून उर्मिलानगरमध्ये आणले. तिथे फातिमा यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास व त्याच्याकडील पैसे काढून घेण्यास चिथावणी दिली. त्यानंतर दोन्ही संशयितांनी पुन्हा आफ्रिदला मारहाण करून खिशातील दोन हजार काढून घेतले. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास, तुला व इकलास याला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.