सांगली जिल्ह्यातील ११ घरफोड्यांचा छडा; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त:, सांगली एलसीबीची कामगिरी दोघानां अटक
सांगली : जत, आटपाडी, विटा, तासगाव, इस्लामपूरसह जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तब्बल अकरा घरफोड्यांचा छडा लावत २६ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकाही ही कामगिरी केली. संतोष तुळशीराम चव्हाण (वय ४२), त्याचा मुलगा आशुतोष संतोष चव्हाण (२१ दोघेही रा. एकतानगर, सातारा रस्ता, जत, जि. सांगली), करण अर्जुन चव्हाण (१९, होनसळ, ता. सोलापूर) आणि पांडुरंग सुनील पवार (२६ रा. होटगी, ता. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
घरफोडीतील संशयितांवर कारवाईचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार केले होते. पथकातील पोलिस जत परिसरात गस्तीवर होते. त्या वेळी चौघेजण चोरीचे सोने दागिने विक्रीसाठी चारचाकीतून येणार असल्याची माहिती पथकातील सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, प्रमोद साखरपे, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे यांना मिळाली. तत्काळ पथकाने सपाळा रचला. काही वेळाने जाधव वस्तीनजीक असणाऱ्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे एक चारचाकी थांबली. आतील चौघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.चारचाकीची तपासणी केली असता कापडी पिशवीमध्ये सोने-चांदीचे दागिने आढळले. मागील बाजूस असणाऱ्या सीटच्या खाली स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्क्रू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हॅण्डग्लोज आदी साहित्य मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चौघा संशयितांनी मागील काही महिन्यात जत, विटा, इस्लामपूर, चिंचणी वांगी आणि आटपाडी परिसरातील बंद घरे आणि दुकाने फोडून घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचेही पोलिसांना सांगितले. अटकेतील संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर जत पोलिस ठाणे आणि कर्नाटक राज्यातही घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.