Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?

फडणवीसांकडून दोन्ही ठाकरेंच्या युतीचा 'टप्प्यात कार्यक्रम'? 'त्या' गुप्त भेटीमुळे महाराष्ट्रात 'राज'कीय भूकंप?
 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ब्रॅण्ड ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येतील अशी दाट शक्यता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता या मनोमिलनामध्ये एक ट्विस्ट येईल की काय अशी घडामोड आज मुंबईत घडली. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंच्या कार मागोमाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा या हॉटेलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे.

कुठे झाली राज आणि मुख्यमंत्र्यांची भेट?
मुंबईतील वांद्रे येथील 'हॉटेल ताज लँड एण्ड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहीत मिळत आहे. राज ठाकरेंची आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यापूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याने राज आज पदाधिकाऱ्यांबरोबर नेमकं काय बोलणार याकडे विशेष लक्ष लागून आहे.

'हॉटेल ताज लँड एण्ड'मध्ये आधी राज ठाकरे दाखल झाल्यानंतर त्याच्या भेटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांमध्ये राजकीय चर्चा होणार असल्याने या चर्चेनंतर राज काही मोठा निर्णय जाहीर करणार का याकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. आता फडणवीसांच्या या राजकीय खेळीने दोन्ही सेनांच्या युतीचा डाव फसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे एकत्र येण्याची चर्चा
मुंबई महानगरपालिकेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी दोन्ही सेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. राज आणि उद्धव एकत्र आले तर त्याला मोठा फटका मुंबईमध्ये भाजपाला बसू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळेच आता या मनोमिलनाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राज आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात

आज दुपारी बारा वाजता राज ठाकरे मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष यांची शिवतीर्थ येथे बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे सायंकाळी ठाणे दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ठाण्यात काका-पुतण्याच्या वाढदिवसाचा एकच बॅनर
मनसे प्रमुख राज ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ठाण्यात ठाकरे गटाकडून एकत्र बॅनर झळकले आहेत. महाराष्ट्र हितासाठी आपल्या पिढ्या समर्पित करणारे नाव ठाकरे असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे. एका बाजूला राज ठाकरे यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.