उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने दाखल झाली.खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे वारंवार होणाऱ्या या दुर्घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, याआधी ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. त्या अपघातात वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटना आणि आणीबाणीच्या लँडिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका हेलिकॉप्टरला रस्त्यावरच क्रॅश लँडिंग करावे लागले होते, तर यात्रेच्या सुरुवातीला झालेल्या एका अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.