Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नीट'च्या गुणवाढीसाठी ९० लाख रुपयांचा दर:, सीबीआयकडून सांगली, मुंबईतून दोघांना अटक

नीट'च्या गुणवाढीसाठी ९० लाख रुपयांचा दर:, सीबीआयकडून सांगली, मुंबईतून दोघांना अटक
 

मुंबई, ता. १४: नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याच्या भूलथापा देऊन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई, सांगली येथून अटक केली आहे. संदीप शहा आणि सलीम पटेल अशी अटक आरोपींची नावे असून, ते प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ९० लाख रुपये मागत असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी ओळख असून, त्यांच्यामार्फत नीट परीक्षेतील गुण वाढवण्यात येतील. किती गुण वाढले याची माहिती निकालाच्या सहा तासांआधी पालकांना कळू शकेल, असे ही टोळी पालकांना सांगत होती.

अनेक विद्यार्थी, पालक जाळ्यात
सीबीआयने शहा, पटेल यांच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी करून घेतली. त्यात गुन्ह्याशी संबंधित भक्कम पुरावे हाती लागल्याचा दावा करण्यात आला. या तपासणीत आरोपींशी संपर्क साधलेले, गुण वाढवून घेण्यास इच्छुक असलेले पालक, विद्यार्थ्यांची माहिती उघड झाली आहे. विद्यार्थ्यांचे रोल नंबर, ओएमआर शीट, अॅडमिट कार्ड आणि हवालामार्फत घडलेल्या आर्थिक व्यवहारांबाबतची महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचे सांगण्यात आले. 
 
शहा हा सोलापूरचा रहिवासी असून, नीटच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मुंबईत भेट घेऊन त्यांना जाळ्यात अडकवण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती. तो पालकांना परळच्या आयटीसी अँड मराठा हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा करीत असे, अशी माहिती सीबीआय प्रवक्त्याने दिली. शहा याला ९ जूनला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या, तर पटेल नवी मुंबईत अॅडमिशन कन्सल्टन्सी चालवतो. विद्यार्थी, त्यांच्या पालकांना तो शहाकडे पाठवत असे. त्याला सांगली येथून अटक करण्यात आली. या टोळीतील अन्य साथीदार पुण्याचा रहिवासी असून, तोही कन्सल्टन्सी चालवतो. त्याचा आणि अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतील अधिकाऱ्याचा या घोटाळ्यात सहभाग किंवा संबंध आढळलेला नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.